कंट्रोल रुमकडे सर्वाधिक तक्रारी लस मिळत नसल्याच्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:30 IST2021-07-14T04:30:55+5:302021-07-14T04:30:55+5:30
सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्यावेळी वेळेत मदत मिळावी व रुग्णांसह नातेवाईकांचीही ससेहोलपट थांबावी, यासाठी प्रशासनाने नियंत्रण कक्ष ...

कंट्रोल रुमकडे सर्वाधिक तक्रारी लस मिळत नसल्याच्या!
सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्यावेळी वेळेत मदत मिळावी व रुग्णांसह नातेवाईकांचीही ससेहोलपट थांबावी, यासाठी प्रशासनाने नियंत्रण कक्ष सुरु केले आहेत. जिल्हा परिषदेसह जिल्हाधिकारी कार्यालयातही कंट्रोल रुम तयार करण्यात आली असून, नागरिकांना २४ तास मदत केली जात आहे. या कंट्रोल रुमकडे सध्या येत असलेल्या सर्वाधिक तक्रारींमध्ये लस मिळत नसल्याच्या अथवा केंद्रावर गर्दी वाढल्याच्या तक्रारींचे प्रमाण जास्त आहे. याशिवाय कोविड रुग्णालयातील अव्यस्थतेबाबतही काही तक्रारी प्राप्त होत आहेत.
जिल्ह्यातील कोरोनास्थिती अद्यापही कायम आहे. सध्या १० हजारांवर रुग्ण उपचार घेत असून, आरोग्य यंत्रणेवरील ताण कायम आहे. या कालावधीत बेडची उपलब्धता व कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मदतीसाठी कंट्रोल रुम तयार करण्यात आल्या आहेत. महापालिका क्षेत्रातही एक कक्ष कार्यन्वित करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोल रुममध्ये सध्या येत असलेल्या कॉल्समध्ये लसीकरणाबाबतची विचारणा सर्वाधिक होत आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करावी, लस न मिळाल्यास काय यासह रुग्णालयांचीही माहिती विचारली जाते. क्वचितप्रसंगी उपचाराविषयी तक्रारी येत आहेत. सध्यातरी लसीकरण व लस घ्यायला गेल्यानंतर तिथल्या गर्दीबाबतच तक्रारी होत आहेत.
चौकट
लस मिळाली नाही काय करु?
* सध्या १८ वर्षांवरील लसीकरण गतीने सुरु आहे. अगदी ५० हजारांवर डोस उपलब्ध होत आहेत. तरीही अनेकांना लस मिळत नसल्याची तक्रार आहे. यासाठीही तक्रार केली जात आहे.
* लसीचा पहिला डोस व दुसऱ्या डोसमधील अंतराबाबत अनेकजण अद्यापही व्दिधा मन:स्थितीत आहेत. हे नागरिक कंट्रोल रुमला फोन करुन अंतर किती असावे, लस प्रभावी राहील का, याबाबतही विचारणा करत आहेत.
चौकट
औषधांची उपलब्धता आणि रुग्णांची अडचण
१) गेल्या महिन्यात कोरोनाबाधितांवर उपचारासाठी रेमडेसिविरची आवश्यकता अधिक लागत होती. त्या कालावधीत केवळ आणि केवळ या इंजेक्शनच्या मागणीसाठी सर्वच कंट्रोल रुमना फोन येत होते.
२) पहिल्या लाटेच्या मानाने दुसऱ्या लाटेत बेडच्या उपलब्धतेवरुन रुग्णांना धावपळ करावी लागली नाही. तरीही ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडच्या उपलब्धतेसाठी कंट्रोल रुमवर मदत घेतली जात होती.
३) जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमधील सेवासुविधा व रुग्णांना होत असलेल्या काही तक्रारी आल्यानंतर प्रशासनाने त्याचे तातडीने निराकरण केले.
चौकट
कंट्रोल रुमकडे आलेल्या तक्रारी
कंट्रोल रुममध्ये सलगपणे सेवा दिली जाते. यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांकडे जिल्ह्यातील रुग्णालयांतील बेडची माहिती अद्ययावत असते. तरीही या महिनाभरात लसीकरणाबाबतच्या तक्रारींचेच प्रमाण अधिक आढळून आले.
कोट
कोरोना कालावधीत आवश्यक ती मदत मिळण्यासाठी नियंत्रण कक्षाची मदत होते. सर्व ठिकाणी आलेल्या तक्रारींचे तातडीने निराकरण करुन त्यांच्या अडचणी सोडवल्या जातात.
- रफिक नदाफ, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी