ST Strike : विलीनीकरण करणार नसाल तर स्वेच्छामरण द्या, एसटी कर्मचाऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 18:03 IST2021-12-21T18:03:07+5:302021-12-21T18:03:56+5:30
एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी अप्पर तहसील कार्यालयावर आज, मंगळवारी धडक मोर्चा काढला. विलीनीकरणाच्या घोषणांनी राजवाडा परिसर दणाणून सोडला.

ST Strike : विलीनीकरण करणार नसाल तर स्वेच्छामरण द्या, एसटी कर्मचाऱ्यांची मागणी
सांगली : एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी अप्पर तहसील कार्यालयावर आज, मंगळवारी धडक मोर्चा काढला. या मोर्चात कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या घोषणांनी राजवाडा परिसर दणाणून सोडला. यावेळी कर्मचाऱ्यांनी स्वेच्छामरणाची मागणी देखील केली. भाजप नेत्यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.
सांगलीत संपाचा मंगळवारी ४५ वा दिवस होता. जिल्ह्यात ५० टक्के कर्मचारी अजूनही संपात सहभागी आहेत. मंगळवारी त्यांनी तहसीलवर मोर्चाचे नियोजन केले होते. सांगलीसह मिरज आगारातूनही आंदोलक कर्मचारी सहभागी झाले. वाद्यांच्या गजरात बसस्थानकापासून मोर्चा सुरु झाला. माजी आमदार नितीन शिंदे, नगरसेविका स्वाती शिंदे, अविनाश मोहिते आदींनी नेतृत्व केले. मोर्चामध्ये महिला कर्मचाऱ्यांची अखंड घोषणाबाजी सुरु होती. शिवाजी पुतळा, महापालिकामार्गे आंदोलक राजवाड्यात आले. अपर तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांना निवेदन दिले.
नितीन शिंदे म्हणाले की, राज्यभरात ५५ बळी गेल्यानंतरही सरकारला जाग आलेली नाही. विलीनीकरणाच्या मागणीवर आम्ही ठाम असून माघार घेणार नाही. स्वाती शिंदे यांनीही सरकार राजकारण करत असल्याचा, तसेच आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.
बघताय काय, सामिल व्हा!
मोर्चा सुरु असताना काही एसटी गाड्याही धावत होत्या. गाडीतील कर्मचारी मोर्चाकडे पाहत होते. त्यांना उद्देशून आंदोलकांनी `बघताय काय, सामिल व्हा` अशी घोषणाबाजी केली.