आमदारांनी दुष्काळप्रश्नी नेतृत्व करावे
By Admin | Updated: October 24, 2015 00:22 IST2015-10-24T00:08:14+5:302015-10-24T00:22:02+5:30
मानसिंगराव नाईक : विश्वास कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ

आमदारांनी दुष्काळप्रश्नी नेतृत्व करावे
शिराळा : शिराळा तालुक्यात यावर्षी मोठा दुष्काळ आहे. मात्र शासनाने दुष्काळ जाहीर केलेला नाही. आता शेतकरी वर्गासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन दुष्काळाचे सर्व निकष येथे लावावेत. यासाठी लढा उभा करण्याची वेळ आली आहे. विद्यमान आमदारांनी या लढ्याचे नेतृत्व करावे. शिवाजीराव देशमुख यांच्यासह मी स्वत: या लढ्यात उतरेन, असे प्रतिपादन माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक साखर कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभावेळी ते बोलत होते. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्याहस्ते काटापूजन व गव्हाणीत ऊस मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला.
अध्यक्ष नाईक म्हणाले, तालुक्याच्या इतिहासात एवढा मोठा दुष्काळ प्रथमच पडला आहे. याअगोदर या तालुक्याने कधीही दुष्काळासाठी मदत मागितली नाही. त्यामुळे आपला पहिला हक्क आहे. चुकीची आणेवारी व शासनाचे धोरण यामुळे दुष्काळाचे निकष या तालुक्यास मिळाले नाहीत. चांदोली धरणातही पाणीसाठा पुरेसा नाही. तरीही वाकुर्डे योजना कार्यान्वित करुन तलाव, धरणे भरून घ्यावीत.
विश्वास साखर कारखान्याचे खासगीकरण करण्याचा कोणताही पापदायक विचार आपल्या मनात आलेला नव्हता आणि येणारही नाही. त्यामुळे या कारखान्याच्या विकासाला बाधा येईल असे कृत्य कोणीही करु नये, असेही नाईक यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी सर्जेरावदादा बँकेचे अध्यक्ष हंबीरराव नाईक, उदयसिंगराव नाईक, शिवाजीराव घोडे—पाटील, पं. स. उपसभापती सम्राटसिंह नाईक, रणजितसिंह नाईक, युवराज गायकवाड, दिनकरराव पाटील, बाबासाहेब पवार, कार्यकारी संचालक राम पाटील, भीमराव गायकवाड, विकास कदम, शंकरराव नांगरे, प्रमोद नाईक, अशोकराव पाटील उपस्थित होते.
विजयराव नलवडे यांनी प्रास्ताविक केले. अशोकराव कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. हंबीरराव पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)
दुष्काळी मदत : पहिला हक्क आमचा
यावेळी मानसिंगराव नाईक म्हणाले की, आजवर शिराळा तालुक्यातील जनतेने कोणत्याही शासकीय मदतीची अपेक्षा केलेली नव्हती, त्याची गरजही कधी भासली नाही. पण यंदा स्थिती गंभीर आहे. शेतकऱ्यांना खरोखर मदतीची गरज आहे. आजवर आम्ही कधीही मदत घेतली नाही, त्यामुळे दुष्काळासाठीच्या मदतीवर पहिला हक्क आमचा आहे.
‘आंदोलकांनी’ स्वत: किती दर दिला?
विश्वास कारखान्याने गेल्या १0 ते १२ वर्षात सतत चांगला दर देण्याचा प्रयत्न केला आहे. सहवीज निर्मिती, डिस्टिलरी, कार्बनडाय आॅक्साईड फिलिंग या प्रकल्पांमुळे या कारखान्याचा विकास दर चढता आहे. नामांकित कारखान्यांपेक्षाही जादा ऊस दर दिला आहे. येथील विरोधक शेतकरी संघटनेचा झेंडा घेऊन ऊस दरासाठी आंदोलन करीत होते. त्यांनी स्वत:च्या कारखान्याकडून किती ऊस दर दिला आहे? कामगार, वाहतूक कंत्राटदार, तोडणी कामगार यांचेही पैसे दिलेले नाहीत, अशी टीका नाईक यांनी केली.