मिरजेत वानलेस रुग्णालय कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:30 IST2021-09-21T04:30:15+5:302021-09-21T04:30:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : मिरजेतील वानलेस रुग्णालयाच्या संचालक, प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार करीत कर्मचाऱ्यांनी ...

मिरजेत वानलेस रुग्णालय कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरजेतील वानलेस रुग्णालयाच्या संचालक, प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार करीत कर्मचाऱ्यांनी सोमवारी काम बंद आंदोलन केले. रुग्णालय व्यवस्थापन समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मनसे कामगार सेना व भारतीय कर्मचारी महासंघातर्फे आंदोलन करून कर्मचाऱ्यांना वेतन नियमित देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, रुग्णालयाचे संचालक डॉ. नथानिएल ससे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
कोविड साथ सुरु झाल्यानंतर गेले वर्षभर वानलेस रुग्णालय कर्मचाऱ्यांना वेतन अनियमित मिळत आहे. कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युएटी व इतर भत्ते वेतनातून मिळत नसल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिल्याने सोमवारी सकाळी कर्मचारी व व्यवस्थापन समिती व रुग्णालय प्रशासनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. रुग्णालय प्रशासनाने कर्मचाऱ्यांसोबत बैठक रद्द करुन ही व्यवस्थापन समितीची बैठक कोल्हापुरात घेतल्याने कर्मचारी संतप्त झाले. अत्यावश्यक सेवा वगळता कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. रुग्णालय प्रशासन मागण्या मान्य करेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा घेत संचालक डॉ. नथानिएल ससे यांना हटविण्याचीही मागणी केली. अखेर व्यवस्थापन समिती सदस्यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत कार्यवाहीचे आश्वासन दिले. दरम्यान, कोल्हापुरात झालेल्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीत सात वर्षांचा कार्यकाळ संपल्याने संचालक डॉ. ससे यांनी दिलेला राजीनामा मंजूर करण्यात आला. नवीन संचालक निवडीपर्यंत तीन महिन्यांसाठी प्रभारी संचालक म्हणून डाॅ. ससे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.