लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरजेत दहशत माजविण्याच्या उद्देशाने पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. भाऊ ऊर्फ असिफ शकील मुल्ला (वय २४, रा. माळी गल्ली, मिरज), असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून रिव्हॉल्व्हर व जिवंत काडतुसे, अशी ६० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यात बेकायदेशीरपणे हत्यार घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पाेलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक मिरजेत गस्तीवर होते. यावेळी शहरातील ॲपे बेकरीजवळ एक तरुण दहशत माजविण्याच्या उद्देशाने पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्यास ताब्यात घेत झडती घेतली असता, त्याच्याजवळ ६० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल व ४०० रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे मिळून आली. त्याच्यावर मिरज शहर पोलिसांत आर्म ॲक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष सूर्यवंशी, नीलेश कदम, अरुण औताडे, मेघराज रुपनर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.