Miraj Civil's fugitive stewardship | मिरज सिव्हिलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

मिरज सिव्हिलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

ठळक मुद्दे मिरज सिव्हिलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

सदानंद औंधे ।
मिरज : उपचारासाठी दाखल गरीब रुग्णांना बाहेर टाकल्याने मिरज सिव्हिलच्या दोन कर्मचाऱ्यांविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने मिरज सिव्हिलचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. गरीब व गरजू रुग्णांचा आधार असणा-या मिरज सिव्हिलमध्ये रुग्णांची होणारी हेळसांड रुग्णांच्या जिवावर बेतली आहे. औषधांचा तुटवडा, शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षायादी या असुविधांसह आता उपचारही नाकारण्यात येत असल्याचे चित्र आहे.

आरोग्य पंढरी म्हणून ओळखल्या जाणा-या मिरज शहरात गरीब रुग्णांना मात्र केवळ शासकीय रुग्णालयाचाच आधार आहे. १९६२ मध्ये तत्कालीन राष्टपतींच्याहस्ते मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू झाले.

रुग्णालयामुळे गरीब रुग्णांची सोय झाली. मिरज सिव्हिलच्या आंतररुग्ण विभागाची ४५० खाटाऐवढी क्षमता असून, दररोज पाचशे रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतात. रुग्णांची संख्या मोठी असताना, येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने रुग्णसेवेबाबत सावळागोंधळ आहे. मिरजेत डायलेसीस, एमआरआय, सिटीस्कॅन, रक्तपेढी यासह अनेक सुविधा उपलब्ध असतानाही रुग्णांना सांगलीला पिटाळण्यात येते. अनेक विभागांमध्ये पदे रिक्त आहेत. अनेक वैद्यकीय कर्मचारी नेहमी अनुपस्थित असल्याने उपस्थित राहणाºया कर्मचा-यांवर कामाचा जास्त बोजा आहे.

सिव्हिलच्या सेवेत असलेली अनेक डॉक्टर मंडळी खासगी रुग्णालये चालवितात. काहीजण रुग्णांना स्वत:च्या खासगी रुग्णालयात घेऊन जातात. मिरजेत दोन शस्त्रक्रियागृहे कार्यान्वित असतानाही रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादीवर ठेवण्यात येते. लिफ्ट बंद अवस्थेत असल्याने रुग्णांचे हाल होतात. स्ट्रेचरवरून नातेवाईकांनाच रुग्णास न्यावे लागते. रुग्णांची संख्या मोठी असल्याने दैनंदिन स्वच्छता आवश्यक आहे. मात्र स्वच्छतेचा ठेका देण्यात आला असल्याने स्वच्छतेचा अभाव आहे.

रुग्णालयातील शौचालये दुर्गंधीयुक्त असल्याने रुग्ण व नातेवाईक हैराण आहेत. रुग्णालयाच्या आवारात अस्वच्छतेमुळे डासांचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव आहे. रुग्णालयाचा जैविक कचरानिर्मूलन प्रकल्प बंद असल्याने जैविक कचरा उघड्यावर टाकण्यात येत असल्याने महापालिकेने रुग्णालय प्रशासनास दंड केला आहे. गरीब व वृध्द रुग्णांना उपचार नाकारण्याच्या घटना नेहमीच्या आहेत. तीन अत्यवस्थ रुग्णांना उपचार न करता बाहेर टाकल्याने एकाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षकांसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र याप्रकरणी सिव्हिल प्रशासनाकडून या प्रकरणाशी संबंधित डॉक्टर मंडळींना वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

Web Title:  Miraj Civil's fugitive stewardship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.