मिरज तालुक्याचे विभाजन रखडले
By Admin | Updated: January 3, 2015 00:14 IST2015-01-02T23:18:02+5:302015-01-03T00:14:01+5:30
राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष : स्वतंत्र सांगली तालुक्याच्या मागणीला महसूलमंत्र्यांचा ठेंगा

मिरज तालुक्याचे विभाजन रखडले
मिरज : मिरज व पश्चिम भागातील ३० गावांतील ग्रामस्थांना महसुली कामासाठी मिरजेला येणे गैरसोयीचे असल्याने मिरज तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र सांगली तालुक्याची मागणी आहे. सांगली तालुक्याच्या रखडलेल्या प्रस्तावाबाबत नवीन महसूलमंत्र्यांनीही ठोस भूमिका न घेता तालुका विभाजनाच्या मागणीबाबत तोंडाला पाने पुसली आहेत.
प्रशासकीय सोयीसाठी बहुसंख्य ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणीच तालुका प्रशासन आहे. मात्र सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण मिरज तालुक्यात आहे. ७२ गावे आणि ६ लाख ०५ हजार लोकसंख्या असलेल्या मिरज तालुक्यात मिरज, सांगली व इस्लामपूर हे असे अडीच विधानसभा मतदारसंघ येतात. नदीकाठचा पश्चिम भाग व कर्नाटक सीमेवरील पूर्व भागापर्यंत मिरज तालुक्याची हद्द आहे. महसुली कामे व शासकीय, शैक्षणिक कामकाजासाठी आवश्यक असलेले दाखले मिळविण्यासाठी पश्चिम भागातील ३० गावांतील ग्रामस्थांना मिरजेला यावे लागते.
केवळ सांगली शहरातील नागरिकांना विविध प्रकारचे दाखले मिळण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. स्वतंत्र सांगली तालुका झाल्यास पश्चिम भागातील ग्रामस्थांची सोय सांगलीत होऊन, मिरजेतील प्रशासकीय ताण कमी होणार आहे. मिरज तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र सांगली तालुक्यासाठी तहसीलदारांसह अन्य अधिकारी, कर्मचारी व इमारत, वाहनांसाठी सुमारे दोन कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. विजयनगर येथे नवीन प्रशासकीय इमारतीत जागा मिळाल्यास तालुका कार्यालय लगेच सुरू करता येणे शक्य असल्याचे, प्रशासनाने चार वर्षांपूर्वी शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.
मिरज तालुक्यात आठ मंडल विभाग असून त्यापैकी मिरज, आरग, मालगाव, कवलापूर हे मिरज तालुक्यात व सांगली, कसबे डिग्रज, बुधगाव, कवलापूर हे मंडल विभाग सांगली तालुक्यात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. मिरज पश्चिम भागात पूरस्थिती उद्भवते, तर पूर्व भागात दुष्काळी परिस्थितीबाबत प्रशासनाला उपाययोजना करावी लागते. दरम्यान, गेल्या दहा वर्षात अनेकवेळा सांगली आणि मिरज असे दोन तालुके करण्याची मागणी होऊनही राजकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
मिरज तालुक्यातील गावे
मिरज, बामणी, निलजी, वड्डी, ढवळी, म्हैसाळ, विजयनगर, नरवाड, आरग, बेडग, लिंगनूर, खटाव, शिंदेवाडी, लक्ष्मीवाडी, मालगाव, शिपूर, डोंगरवाडी, एरंडोली, व्यंकोचीवाडी, खंडेराजुरी, पायाप्पाचीवाडी, बेळंकी, संतोषवाडी, कदमवाडी, सलगरे, चाबुकस्वारवाडी, टाकळी, बोलवाड, मल्लेवाडी, जानराववाडी, कवलापूर, रसूलवाडी, खरकटवाडी, सांबरवाडी, काकडवाडी, सावळी, कानडवाडी, मानमोडी, तानंग, कळंबी, सिध्देवाडी, सोनी, करोली (एम), भोसे, पाटगाव.
सांगलीतील प्रस्तावित गावे
सांगली, अंकली, सांगलीवाडी, हरिपूर, कसबे डिग्रज, समडोळी, मौजे डिग्रज, तुंग, दुधगाव, सावळवाडी, मोळा, कुंभोज, माळवाडी, कवठेपिरान, शेरीकवठे, बुधगाव, कुपवाड, वानलेसवाडी, बामणोली, कर्नाळ, पद्माळे, बिसूर, नांद्रे, वाजेगाव, कावजी खोतवाडी, माधवनगर.
नवीन सरकारकडून तर निर्णय होणार का?
आ. सुरेश खाडे यांनी याबाबत गतवर्षी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर तालुका विभाजनाचे निकष निश्चित करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आल्याचे उत्तर दिले होते. त्यानंतर आता सत्ताबदलानंतर सांगली, मिरजेच्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी महसूलमंत्र्यांकडे स्वतंत्र सांगली तालुक्याची मागणी केल्यानंतर, त्यांनीही स्वतंत्र तालुक्याची मागणी शासनाच्या विचाराधिन असल्याचे सांगून तालुका निर्मितीबाबत ठोस निर्णय दिलेला नाही. सत्ताबदलानंतरही स्वतंत्र सांगली तालुक्याबाबत निर्णय होण्यासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.