मिरज : मिरजेत माजी महापौर इद्रिस नायकवडी व राष्ट्रवादी शहराध्यक्ष साजीद पठाण यांच्या गटांत हाणामारी झाली. साजीद पठाण समर्थकांनी इद्रिस नायकवडी यांच्या संपर्क कार्यालयावर हल्ला चढवून मोडतोड केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत. इद्रिस नायकवडी व साजीद पठाण यांच्या गटात राजकीय वैमनस्य आहे. महापालिका निवडणुकीच्या वादातून दोन्ही गटांच्या समर्थकांत अनेकवेळा हाणामारीचे प्रकार घडले आहेत. रविवारी, दुपारी कोल्हापूर रस्त्यावर खतीब हॉलमध्ये लग्नाच्या कार्यक्रमात साजीद पठाण, समीर सय्यद यांची नायकवडी समर्थक सर्फराज कुरणे यांच्याशी बाचाबाची, हमरीतुमरी झाली. या घटनेनंतर बुधवार पेठेत पठाण समर्थक एकत्रित झाले. जमावाने तलवार, काठ्या घेऊन जवाहर चौकातील नायकवडी यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळविला. यावेळी इद्रिस नायकवडी व नुरुद्दीन मुल्ला यांच्या अंगावर जात शिवीगाळ, धक्काबुक्कीचा प्रयत्न केला. कार्यालयातील टेबलचीमोडतोड केली. हे वृत्त समजताच नायकवडी समर्थक एकत्रित झाले होते. दोन गटांतील हाणामारी व तणावामुळे पोलिसांनी जवाहर चौक, बुधवार पेठ व कुरणे गल्ली परिसरात बंदोबस्त ठेवला होता. तक्रार देण्यासाठी दोन्ही गटांच्या समर्थकांची पोलीस ठाण्यात गर्दी झाली होती. सायंकाळपर्यंत दोन्ही गटांत तडजोडीचे प्रयत्न सुरू होते. याप्रकरणी इद्रिस नायकवडी यांनी साजीद पठाण यांच्यासह नऊजणांनी तलवारी, काठी, गज घेऊन कार्यालयावर हल्ला चढविला. जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली आहे. साजीद पठाण यांनी गांधी चौक पोलिसांत इलियास नायकवडी, इद्रिस नायकवडी, अतहर नायकवडी यांच्यासह आठजणांविरुद्ध तक्रार दिली. (प्रतिनिधी)गांधी चौकातही मारामारीनायकवडी-पठाण मारामारीच्या घटनेनंतर रात्री गांधी चौकात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या दोन गटात मारामारी झाली. जयंत पाटील समर्थक लालू मेस्त्री, शकील पिरजादे यांच्यासह आठ ते दहाजणांनी स्टंप, लोखंडी सळीने हल्ला केल्याची तक्रार आर.आर. पाटील समर्थक समीर कुपवाडे यांनी पोलिसात केली आहे. एमआयएमचे काम सुरू करीत नसल्याच्या कारणावरून लालू मेस्त्री याच्यासह साथीदारांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मिरजेत नायकवडी-पठाण गटांत हाणामारी
By admin | Updated: August 10, 2015 00:11 IST