महापुराने पक्ष्यांचे स्थलांतर विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:28 IST2019-11-12T05:28:09+5:302019-11-12T05:28:12+5:30
ऑगस्टमध्ये आलेल्या महापुराचा फटका पक्ष्यांच्या जीवनचक्रालाही बसला आहे.

महापुराने पक्ष्यांचे स्थलांतर विस्कळीत
संतोष भिसे
सांगली : ऑगस्टमध्ये आलेल्या महापुराचा फटका पक्ष्यांच्या जीवनचक्रालाही बसला आहे. पाणी पात्राबाहेर पडल्याने तसेच नदीचा फुगवटा व पाण्याचा वेग जास्त राहिल्याने पक्ष्यांना खाद्य स्वरूपात कृमी-कीटक मिळत नसल्याने पक्षी नदीपासून दुरावले. उभी पिके नष्ट झाली तसेच पेरण्या लांबल्याने पक्ष्यांचे स्थलांतर विस्कळीत झाले आहे.
जिल्ह्यात ४० हून अधिक प्रजातीचे पक्षी सैबेरिया, लडाख, उत्तर भारतासह युरोपातील कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी येथे येतात. चक्रवाकसह अनेक प्रजातींचे बदक, पाणपक्षी, तुतवार, सॅण्डपाईपर, शांक असे पक्षी जिल्ह्याचा पाहुणचार घेतात. संपूर्ण कृष्णाकाठ, सागरेश्वर अभयारण्य, दंडोबा व गिरलिंग डोंगररांगा, मायणीजवळचा येरळवाडी तलाव, चांदोली, आटपाडी व भोसे तलाव, देशिंग-खरशिंगची माळराने, खंडेराजुरीतील ब्रम्हनाथ देवालयाचा परिसर येथे फेब्रुवारी-मार्चपर्यंत मुक्काम करतात. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून त्यांचे आगमन सुरू होते. नोव्हेंबरमध्ये वेळू वटवट्या सांगलीत दिसू लागतो. यंदा महापुरात किनाऱ्यांसोबत दलदलीच्या पारंपरिक जागाही वाहून गेल्या. त्यामुळे अन्यत्र नव्याने निर्माण झालेल्या पाणथळ जागा व दलदलींकडे पक्ष्यांना वळावे लागले. एकूणच त्यांचे स्थलांतराचे चक्र विस्कळीत झाल्याचे पहायला मिळत आहे.
>सांगलीत येणारे पक्षी
वेळू वटवट्या, चक्रवाकसह अनेक प्रजातींचे बदक, रंगीत करकोचे, अग्निपंख (फ्लेमिंगो), असंख्य पाणपक्षी, तुतवार, सॅण्डपाईपर, शांक आदी.
>‘वेळू वटवट्या’
अजूनही दिसला नाही...
पक्षीप्रेमींना यंदा पक्ष्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. नोव्हेंबर उजाडला तरी, सांगली परिसरात मोठ्या संख्येने पक्ष्यांचे दशर््ान नाही.
एरवी नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात येणारा वेळू वटवट्या अजूनही दिसलेला नाही. पावसाळा लांबल्याने व रानात पिके नसल्याने खाद्यान्नाचा तुटवडा भासत आहे. दुसरीकडे अनेक नव्या दलदलीच्या जागा निर्माण झाल्याचा फायदाही होत आहे. त्यामुळे ते विखुरले आहेत.
- शरद आपटे, पक्षी अभ्यासक