सांगली : सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे तीन हजार एकर जागेवर पश्चिम महाराष्ट्रातील सुसज्ज अशी एमआयडीसी उभारली जाणार आहे. त्यासाठी जागा संपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच सांगलीत हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र आणि डिफेन्सचा प्रकल्प उभारण्यासाठी लवकरच बैठक घेतली जाईल. सहा महिने ते वर्षात सांगलीत मोठा प्रकल्प आणला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.सांगलीत पश्चिम महाराष्ट्र उद्योग, व्यापार परिषदेनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री सामंत म्हणाले, उद्योग, व्यापार परिषदेत विविध मागण्या, अडचणी मांडल्या आहेत. मिरज औद्योगिक व विकासासाठी ३७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यातील १८ कोटी रुपये रस्ते, तर दिवाबत्तीसाठी नऊ कोटी रुपये खर्च केले जातील. म्हसवड येथे तीन हजार एकरांवर पश्चिम महाराष्ट्रातील सुसज्ज अशी एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झालेली आहे. केंद्राच्या मदतीतून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे औद्योगिक क्रांती होऊन विकासाला चालना मिळेल.
सांगली जिल्ह्यातील ड्रायपोर्टसाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल. जिल्ह्यात अमली पदार्थ उत्पादन केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे बंद असलेल्या कारखान्याची तपासणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. शिवसेनेत येण्यासाठी सांगलीसह राज्यातील अनेकजण इच्छुक आहेत. त्याबाबत लवकरच घडामोड झालेली तुम्हाला पाहायला मिळेल.अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत कर्नाटक सरकारच्या हालचाली सुरू आहेत. राज्य सरकारने कोणताही आक्षेप घेतला नसल्याबाबत विचारले असता मंत्री सामंत म्हणाले, यासंदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून या भागातील लोकांच्या भावना त्यांच्यापर्यंत मांडणार आहे.
त्यांनी इतिहासावर बोलू नयेराहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याबाबत मंत्री सामंत म्हणाले, सोलापूरकर हे माझे मित्र आहेत; परंतु त्यांनी इतिहासाबाबत बोलणे थांबवावे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्याबाबत आणि डॉ. आंबेडकरांबाबत केलेले वक्तव्य चुकीचे व निषेधार्ह आहे, असे सामंत म्हणाले.
‘मी नाराज नाही’उद्योग विभागातील काही अधिकारी परस्पर निर्णय घेतात. माझ्या विभागात काय अपेक्षा आहेत, याबाबतची विचारणा करणे आवश्यक आहे, याबाबतची नाराजी प्रधान सचिवांकडे व्यक्त केली आहे. मी नाराज असल्याची चर्चा होत असली तरी मी नाराज नाही. सांगली नाट्यपंढरी आहे. त्यामुळे माझ्या चेहऱ्यांवर जर कृत्रिम हास्य दिसत असेल तर तुम्हाला ते लक्षात येईल, असे सामंत म्हणाले.
जरांगे यांनी संयम ठेवावाओबीसींवर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे; परंतु यावरून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री यांच्यावर टीका करताना संयम ठेवावा. गैरसमज करून न घेता सरकारशी संवाद ठेवण्याची गरज आहे, असेही सामंत यांनी सांगितले.