‘वसंतदादा’ची सभा बिलावर गाजणार
By Admin | Updated: September 30, 2015 00:08 IST2015-09-29T22:46:58+5:302015-09-30T00:08:17+5:30
=शेतकऱ्यांच्या ३२ कोटींचे काय?: कामगारांच्या थकित पगाराचा प्रश्नही निर्माण होणार

‘वसंतदादा’ची सभा बिलावर गाजणार
सांगली : वसंतदादा साखर कारखान्याकडे २०१३-१४ आणि २०१४-१५ या गळीत हंगामातील ३२ कोटी रुपये शेतकऱ्यांचे थकित आहेत. तसेच कामगारांच्या थकित पगाराचाही प्रश्न गंभीर आहे. या प्रश्नावर बुधवार, दि. ३० रोजी होणारी सभा गाजणार आहे. कारखाना प्रशासनाने हे ओळखूनच शेतकऱ्यांच्या खात्यावर चार दिवसांपूर्वी काही पैसे जमा केले आहेत. परंतु, ती रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्यामुळे शेतकरी व सभासद प्रशासनाला थकित रकमेवरून धारेवर धरणार आहे.
वसंतदादा साखर कारखान्याच्या बिलाचा प्रश्न दोन वर्षांपासून गंभीर निर्माण झाला आहे. २०१३-१४ वर्षामध्ये ऊस पाठविलेल्या शेतकऱ्यांची ३४ कोटी थकबाकी होती. त्यापैकी वीस कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. उर्वरित जवळपास १४ कोटींची बिले शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाहीत. २०१४-१५ या गळीत हंगामामध्ये गाळप केलेल्या उसाचे १७ कोटींचे बिल थकित आहे. या शेतकऱ्यांनी थकित बिल मिळविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मागील आठवड्यात आंदोलन केले होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी दि. ३० सप्टेंबरपर्यंत बिल देण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले आहेत. पण, ती रक्कम तुटपुंजी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर तर केवळ एक हजार रुपयेच जमा झाले आहेत. थकित बिलावरून शेतकरी व सभासद कारखाना प्रशासनास जाब विचारण्याची शक्यता आहे.
वसंतदादा कारखान्यातील कामगारांची थकबाकीही चाळीस कोटींहून अधिक आहे. कामगारांच्या पगाराचा प्रश्न कसा सोडविणार आहे, असाही सभासदांकडून प्रश्न उपस्थित होणार आहे. (प्रतिनिधी)
धडक योजनेच्या पाणीपट्टीचा प्रश्न
वसंतदादा कारखाना धडक पाणी योजना चालवत आहे. या योजना कालबाह्य असल्यामुळे पाणीपट्टी आणि योजनेचा खर्च भागत नाही. वाढीव खर्च कारखाना भरत असल्यामुळेही आर्थिक अडचणी निर्माण होत आहे. यातूनही धडक योजनेवर ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी अन्य कारखान्यास ऊस घालवणार असाल तर घालवा, पण धडक योजनेची पाणीपट्टी प्रामाणिकपणे भरली पाहिजे. तुम्ही अन्य कारखान्याला ऊस घालणार असाल तर वसंतदादा कारखान्याने धडक योजनांच्या पाणीपट्टीचा वाढीव खर्च कशासाठी सोसायचा, असा प्रश्नही वसंतदादा कारखाना प्रशासनाने उपस्थित केला आहे.