सांगली : येथील सिव्हिल हॉस्पिटलजवळील मेडिकल फर्म कराराने चालवताना अफरातफर करून तब्बल ४१ लाख २७ हजार ३१४ रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत फर्म चालक अर्चना सम्राट माने (वय ४०, रा. आंबेडकर रस्ता, सांगली) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित सविता दिनेश जाधव (रा. दत्त मंदिरजवळ, सह्याद्रीनगर, सांगली), त्यांचा पुतण्या विराज विनेश जाधव (रा. त्रिशूल चौक, सांगलीवाडी) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.फिर्यादी अर्चना माने यांची सिव्हील हॉस्पिटल चौकात श्री ईश्वर एजन्सी नावाची फर्म आहे. जवळपास २० वर्षे त्या हॉस्पिटल, मेडिकलला लागणारे साहित्य, सर्जिकल औषधे पुरवतात. संशयित सविता जाधव व विराज जाधव हे माने यांच्या फर्ममध्ये सर्जिकल औषधांची खरेदी, विक्री व व्यवस्थापनाची कामे करत होते.माने यांनी वैयक्तिक अडचणीमुळे या फर्मची देखरेख व व्यवस्थापनाबाबतचे अधिकार सविता जाधव व विराज जाधव यांना जुलै २०२१ रोजी तोंडी कराराने दिले. नफ्यातील ६० टक्के रक्कम जाधव यांना देण्याचे ठरले होते. ६ मार्च २०२३ मध्ये हा करार लेखी स्वरूपात देखील केला. त्यानंतर दरमहा एक लाख रूपये देण्याचे लेखी ठरले.
दरम्यान चार्टड अकाऊंटंट विजय नावंदर यांनी फर्मच्या मालक अर्चना माने यांना जून २०२४ मध्ये लेखी पत्राने हिशोबात तफावत असल्याने पेमेंट, रोखीचे व अन्य व्यवहार तपासण्यास सांगितले. तेव्हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. संशयित सविता जाधव व विराज जाधव यांनी फर्मचे कॅश रिसिट बुक बनावट बनवून मेडिकल, हॉस्पिटलला दिलेल्या साहित्याची, औषधाच्या बिलांची वसुली करून ती फर्ममध्ये जमा केली नाही.हिशोब तपासणीत १ जुलै २०२१ ते १५ मार्च २०२४ या कालावधीत ७५ लाख रु पये हॉस्पिटल व मेडिकलमधून आल्याचे दिसून आले. त्यापैकी ५३ लाख ९० हजार रुपयेच जमा केले. उर्वरीत २१ लाख १२ हजार रु पये दोघांनी जमा केले नाही. तसेच, ऑनलाइन पेमेंट ४० लाख ७५ हजार १०९ रु पये आले होते. त्यापैकी २१ लाख २ हजार ५५७ रु पये खात्यावर भरले. उर्वरीत १९ लाख ७२ हजार ५५२ रु पये जमा केले नाहीत. दोघांनी ४१ लाख २७ हजार ३१४ रुपयांची अफरातफर केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तक्रार अर्जानंतर केलेल्या चौकशीत फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे गुन्हा दाखल केला.
चौकशीनंतर गुन्हा दाखलअर्चना माने यांनी फसवणुकीबाबत पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. उपअधीक्षक यांनी चौकशी करून आर्थिक गुन्हे शाखेकडे अभिप्राय मागवला. त्यांनी चौकशी केल्यानंतर ५ ऑगस्ट २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यास मंजुरी मिळाली. त्यानुसार शुक्रवारी गुन्हा दाखल केला.