महापौर बदलाचे मदन पाटील यांच्याकडून संकेत
By Admin | Updated: November 18, 2014 23:24 IST2014-11-18T22:10:00+5:302014-11-18T23:24:37+5:30
पदाधिकाऱ्यांची झाडाझडती::संजय मेंढे की पाटील?

महापौर बदलाचे मदन पाटील यांच्याकडून संकेत
सांगली : महापौर, उपमहापौर बदलाबाबत सत्ताधारी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री मदन पाटील यांनी आज, मंगळवारी सायंकाळी आयोजित केलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत चाचपणी केली. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह स्थायी सभापती व सदस्य निवडीचे सर्वाधिकार पाटील यांना देण्यात आले. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच मदन पाटील यांनी पालिकेच्या कामकाजात लक्ष घातले. स्थायी सदस्य, सभापती निवडीबाबत सदस्यांची मते जाणून घेण्यासाठी आज सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहात नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीला महापौर कांचन कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, गटनेते किशोर जामदार, स्थायीचे माजी सभापती राजेश नाईक, नगरसेवक सुरेश आवटी यांच्यासह काँग्रेसचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. बैठकीत सुरुवातीलाच विरोधकांकडून होत असलेल्या टीकेचा पाटील यांनी समाचार घेतला. विरोधकांना प्रत्युत्तर देण्यात पदाधिकारी असमर्थ ठरत असल्याच्या कानपिचक्याही त्यांनी दिल्या. यावर पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलत जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला. यावर मदनभाऊंनी त्यांना चांगलेच फटकारत विरोधकांना प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले. खुद्द पाटील यांनीच महापौर बदलाचा विषय बैठकीत काढला. पक्षाच्या काही नगरसेवकांना निवडणुकीवेळी शब्द दिला आहे, तो पाळला पाहिजे. त्याचे काय करायचे? अशी थेट विचारणा नगरसेवकांनाच केली. सर्वच सदस्यांनी, आपण योग्य तो निर्णय घ्यावा, असे सांगत सर्वाधिकार पाटील यांना दिले.
येत्या २० नोव्हेंबरच्या महासभेत स्थायी सदस्यांची निवड होणार आहे. त्याचीही चाचपणी पाटील यांनी बैठकीत केली. स्थायीत काम करण्यासाठी कोण इच्छुक आहे?, असा प्रश्न केला. त्यावर सर्वच सदस्यांनी मौन पाळले. त्यानंतर पाटील यांनी स्वतंत्ररित्या प्रत्येक सदस्याचे मत जाणून घेतले. स्थायी समितीतून काँग्रेसकडून एक महिला सदस्य निवृत्त झाली आहे. त्यामुळे या जागेवर महिला नगरसेवकाला संधी द्यावी, अशी मागणी नगरसेविका अनारकली कुरणे यांनी बैठकीत केली. (प्रतिनिधी)
संजय मेंढे की पाटील?
स्थायी सदस्यांसोबतच सभापती पदाबाबत मदन पाटील यांनी सदस्यांची मते जाणून घेतली. सभापती पदासाठी मिरजेचे संजय मेंढे व सांगलीवाडीचे दिलीप पाटील यांच्यात चुरस आहे. सध्या तरी मिरजेचे संजय मेंढे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे महापौर पदासाठी स्थायी सभापतीपदही वर्षभरासाठी मिरजेला जाण्याची शक्यता आहे.
पदाधिकाऱ्यांची झाडाझडती
महापालिका पदाधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत आजच्या बैठकीत मदन पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. पालिकेतील विरोधी पक्षाकडून पाच कोटींच्या विकास कामांबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यावर मदन पाटील यांनी बोट ठेवत पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. कचरा उठाव, स्वच्छता याबाबत टीका होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर पदाधिकाऱ्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलली. पाच कोटींचा विषय स्थायी समितीचा असल्याने माजी सभापतींनीच उत्तर द्यावे, असे काही सदस्यांनी सांगितले.