महापौरांचा राजीनामा नव्या वर्षात!
By Admin | Updated: December 24, 2014 00:24 IST2014-12-23T22:47:18+5:302014-12-24T00:24:28+5:30
महासभेची प्रतीक्षा : इच्छुकांचे देव पाण्यात; उपमहापौरांचाही राजीनामा घेणार

महापौरांचा राजीनामा नव्या वर्षात!
सांगली : महापालिकेत पदाधिकारी बदलाचे वारे वाहू लागले आहे. विद्यमान महापौर कांचन कांबळे व उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर या दोघांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांना राजीनामा देण्याची सूचना करण्यात आल्याचा दावा इच्छुकांनी केला आहे. त्यासाठी नव्या वर्षाचा मुहूर्त शोधण्यात आला असून जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे होतील, असे सूत्रांनी सांगितले.
दीड वर्षापूर्वी महापालिकेत विकास महाआघाडीच्या सत्तेला सुरूंग लावत काँग्रेसने एकहाती सत्ता घेतली होती. विधानसभा निवडणुकीचे गणित डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी गटाचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांनी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती ही तीनही महत्त्वाची पदे सांगलीकडेच ठेवली होती. विधानसभा निवडणुकीनंतर महापौर व उपमहापौर बदलण्याचे आश्वासनही दिले होते. त्यामुळे या पदासाठी इच्छुक असलेल्यांनी निवडणुकीपर्यंत कोणत्याच हालचाली केल्या नाही.
विधानसभा निवडणुकीनंतर मात्र इच्छुकांच्या हालचाली गतिमान होण्यापूर्वीच मदन पाटील यांनी महापौर व उपमहापौरांच्या राजीनाम्याचा विषय नगरसेवकांच्या बैठकीत काढत त्यांना राजीनामा देण्याचे संकेत दिले. इतर नगरसेवकांना पदाबाबत शब्द दिला आहे, तो पाळावा लागेल, असेही त्यांनी सुनावले होते. त्यावेळी सर्वच नगरसेवकांनी याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार मदन पाटील यांना दिले होते.
काही दिवसांपूर्वीच मदन पाटील पालिकेत आले असता, पुन्हा एकदा त्यांनी इच्छुकांशी हितगुज केली. महापौर व उपमहापौरांनी डिसेंबरअखेरपर्यंतची मुदत मागितली असून नव्या वर्षात राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्याचे इच्छुकांचे मत आहे. त्यामुळेच डिसेंबर महिन्याच्या वीस तारखेपर्यंत होणारी महासभाही सत्ताधारी गटाने घेतली नाही. दोन्ही पदाधिकारी महासभेत राजीनामा देणार आहेत. आता सत्ताधारी काँग्रेसने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच महासभा घेण्याचे नियोजन केले असून त्यात दोन्ही पदाधिकारी राजीनामे देतील, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कांबळे, सातपुते इच्छुक
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौर पदासाठी मिरजेचे विवेक कांबळे यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. त्यात आता मिरजेतील बसवेश्वर सातपुते यांनी उडी घेतली आहे. सातपुते यांनी महापौर पदावर दावा केला आहे. उपमहापौर पदासाठी कुपवाडचे प्रशांत पाटील यांचे नाव आघाडीवर असून महिला सदस्यांना संधीची शक्यता वर्तविली जात आहे.