आरोग्याच्या प्रश्नावरून महासभेत प्रचंड गदारोळ

By Admin | Updated: November 21, 2014 00:26 IST2014-11-20T22:43:36+5:302014-11-21T00:26:40+5:30

विरोधकांचा संताप : महापौरांनी सभा गुंडाळल्याचा आरोप

Massive tension in the General Assembly due to health issues | आरोग्याच्या प्रश्नावरून महासभेत प्रचंड गदारोळ

आरोग्याच्या प्रश्नावरून महासभेत प्रचंड गदारोळ

मिरज : मिरजेतील गॅस्ट्रोची साथ, महापालिका क्षेत्रातील अस्वच्छता, आरोग्याचा प्रश्न यावरून गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ झाला. विरोधकांनी याप्रश्नी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नागरी आरोग्याच्या विषयावर चर्चा न करता स्थायी सदस्य निवडीनंतर सभा संपल्याचे महापौरांनी जाहीर केल्याने राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक झाले. त्यांनी सभेत याविषयीची चर्चा करण्याची मागणी केली, मात्र गोंधळातच सभा संपविण्यात आली.
मिरजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर कांचन कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली महासभा पार पडली. मिरजेतील गॅस्ट्रो, डेंग्यू साथीचे आजार, तसेच दूषित पाणीपुरवठ्याबाबत चर्चेची मागणी शुभांगी देवमाने यांनी केली. संगीता हारगे, दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह सत्ताधारी गटाचे संजय मेंढे यांनीही मिरजेत दूषित पाणीपुरवठा व अस्वच्छतेमुळे साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्त असल्याचे सांगितले. मिरजेत सर्वत्र ड्रेनेज तुंबल्याने पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळत असताना, आरोग्य अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार मेंढे यांनी केली. राष्ट्रवादीच्या सदस्यांनी अस्वच्छता व साथीच्या आजारांबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन करण्याची वारंवार मागणी केली. गटनेते किशोर जामदार यांनी या विषयावर चर्चेला आक्षेप घेतल्याने गोंधळ झाला.
आरोग्य अधिकाऱ्यांना वेतनवाढी देण्याच्या मागणीस दिग्विजय सूर्यवंशी, गौतम पवार यांनी विरोध केला. गेल्या सहा वर्षांपासून इतर कामगारांना पगारवाढ नाकारून केवळ वशिल्याने अधिकाऱ्यांना पगारवाढ देण्यात येत असल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी केला. पालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतनवाढ देऊ नये, अशी मागणी गौतम पवार यांनी केली. जामदार यांच्यासह सत्ताधारी सदस्यांनी वेतनवाढीचे समर्थन करीत, ठराव मंजुरीच्या घोषणा दिल्या. बेवारस मृतदेहांची हेळसांड केल्याप्रकरणी आरोग्य अधिकारी डॉ. आंबोळे यांच्यासह महापालिकेच्या चार कामगारांवरील कारवाई चुकीची असल्याचे दिग्विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पोलीस व सिव्हिल यंत्रणेची असल्याने, कारवाई मागे घेण्याची मागणी गौतम पवार यांनी केली. महापौरांनी सभा संपल्याचे जाहीर केल्याने गोंधळातच सभा संपली.
अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यासाठी सुपारी घेऊन चर्चा करणाऱ्या विरोधकांचा सभा गुंडाळल्याचा आरोप हास्यास्पद असल्याचे गटनेते किशोर जामदार यांनी सांगितले. (वार्ताहर)

महापौरांवर आरोप
मिरजेत गॅस्ट्रोने एकाचा मृत्यू झाला आहे. तरीही सभेत आरोग्य व स्वच्छता या विषयावरील चर्चेला नकार देणाऱ्या महापौरांना या विषयाचे गांभीर्य नाही, असा आरोप दिग्विजय सूर्यवंशी यांनी केला.

Web Title: Massive tension in the General Assembly due to health issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.