दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी
By Admin | Updated: October 28, 2016 23:56 IST2016-10-28T23:56:27+5:302016-10-28T23:56:27+5:30
रात्री उशिरापर्यंत रस्ते फुललेले : सांगलीत ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; किरकोळ विक्रेत्यांचाही व्यवसाय तेजीत

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी
सांगली : आनंदाचे आणि चैतन्याचे प्रतीक असणाऱ्या दिवाळी सणाला उत्साहात सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता बाजारपेठेत खरेदीसाठी हाऊसफुल्ल गर्दी झाली आहे. एरवी केवळ शनिवारच्या बाजारादिवशी असणाऱ्या गर्दीचा उच्चांक मोडत बाजारपेठेत गर्दी होत आहे. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहता, अनेक शोरूम्सनी रात्री उशिरापर्यंत सेवा सुरू ठेवली आहे. साहजिकच विविध सेल, आॅफर्स आणि डिस्काऊंटच्या झगमगाटात रस्त्यावरील किरकोळ विक्रेत्यांकडील खरेदीलाही मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान, शनिवारी आणि रविवारी आणखी गर्दी होणार असल्याने, शहरातील मुख्य बाजारपेठ फुलून जाणार आहे.
दिवाळीच्या सणामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या आठवडाभरापासून लोक खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून तर गर्दीने उच्चांक गाठत हरभट रोड, कापडपेठ, बालाजी चौक, महापालिका चौक, मारूती रोड आदी प्रमुख बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत. शहरातील मॉल्सनीही दिवाळीनिमित्त विविध आॅफर्स जाहीर केल्या असून, मॉल्सही हाऊसफुल्ल आहेत.
रेडिमेड गारमेंटसह रस्त्यावर अगरबत्तीपासून उटणे, लक्ष्मीपूजनाच्या पुस्तकांपासून ते रेडिमेड गारमेंटमधील हजारो प्रकारच्या व्हरायटी सध्या उपलब्ध आहेत. पणत्या, आकाशकंदील, फराळाची खरेदी अंतिम टप्प्यात आली असली तरी, अजूनही विद्युत माळा, पणत्यांची खरेदी होत आहे. शहरात मुख्य बाजारपेठांसह उपनगरांतही सुगंधी उटणे, साबण, सुगंधित तेल आदींचे स्टॉल उभारले असून यालाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सांगली शहराबरोबर, मिरज, कुपवाड शहरातही ग्राहकांची मोठी गर्दी आहे. (प्रतिनिधी)