नगरसेवकांचे मराठी प्रेम बेगडी
By Admin | Updated: November 18, 2014 01:00 IST2014-11-18T00:56:00+5:302014-11-18T01:00:18+5:30
बेळगाव महापालिका : नामांतराबाबत चिडिचूप; सीमाप्रश्नाचा ठरावही मांडला नाही

नगरसेवकांचे मराठी प्रेम बेगडी
बेळगाव : बेळगाव महापालिकेत मराठी भाषिकांची सत्ता असतानादेखील महानगरपालिका बैठकीत मराठी भाषिक नगरसेवकांनी सीमाप्रश्नाचा ठराव तर मांडला नाहीच, शिवाय बेळगावच्या नामांतराबाबत एकही शब्द उच्चारला नाही. त्यामुळे बैठकीत पुन्हा एकदा मराठी नगरसेवकांचे बेगडी प्रेम समोर आले आहे.
बेळगाव महापालिकेच्या पहिल्या बैठकीत सीमाप्रश्नाचा ठराव न मांडल्याने आणि कर्नाटक सरकार कारवाई करील या भीतीने १ नोव्हेंबर या काळ्यादिनाच्या सायकलफेरीत मराठी नगरसेवक सामील झाले नव्हते. यामुळे महापौर महेश नाईक, उपमहापौर रेणू मुतगेकर यांच्या विरोधात मराठी जनतेने रोष व्यक्त केला होता. महापौरांच्या घरावर मोर्चा काढला होता. काही नगरसेवकांना बैठकीत बोलावून ठराव न मांडल्याबद्दल जाबही विचारला होता, पण मराठी भाषिक नगरसेवक सभागृहात गप्प राहिले. मात्र, बेळगाव शहराचे नामांतर बेळगावी असे केल्याने या नामांतराला मराठी नगरसेवकांकडून महापालिकेत विरोध अपेक्षित होता, मात्र सर्वसाधारण बैठकीत बेळगावी नामांतराविरोधात ‘ब्र’सुद्धा न काढल्याने मराठी भाषिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव महापालिकेत एकूण ५८ पैकी ३२ नगरसेवक मराठी भाषिक असून, महापौर-उपमहापौर आणि महत्त्वाची पदे मराठी भाषिक नगरसेवकांकडे आहेत. मात्र महापालिकेच्या कार्यालयावर ‘बेळगावी’ असा फलक लिहिला आहे आणि तरीही मराठी नगरसेवक गप्प का आहेत, असा सवाल जनतेतून विचारला जात आहे. बैठकीत पाणीपट्टी वाढविण्यासंबंधी प्रस्ताव मांडण्यात आला. या ठरावाला सर्वच नगरसेवकांनी विरोध केला. शहराच्या पाणीपुरवठ्यासंबंधी अभ्यास करण्यासाठी समिती नेमून या समितीने पुढील बैठकीत आपला अहवाल सादर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांचे मानधन वाढविण्याचा प्रस्ताव त्वरित मंजूर करण्यात आला. महापौरांना वीस हजार, उपमहापौरांना पंधरा हजार आणि नगरसेवकांना दहा हजार मानधन देण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला. बैठकीत विरोधी गटनेते रमेश सोंटक्की यांनी विकासकामे होत नसल्याचा आरोप केला. यावेळी सत्ताधारी गटनेते किरण सायनाक आणि रमेश सोंटक्की यांच्यात शाब्दिक चकमक झडली. आयुक्त रवीकुमार यांनी शहरात विकासकामे सुरू असल्याचे सांगितले. तसेच चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी ७६० कोटींच्या निविदेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सभागृहाला दिली.
बेळगावच्या नामांतराविषयी महापौर महेश नाईक यांनी गुळमुळीत प्रतिक्रिया नोंदविली. मराठीत बेळगाव, कन्नडमध्ये बेळगावी आणि इंग्रजीमध्ये बेलगाम असेच आहे. सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे आम्ही त्यावर लक्ष केंद्रित केल्याचे महेश नाईक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)