विटा : मंत्री कोणीही होऊ द्या, तुम्ही घाबरू नका. सर्वांचा सात-बारा माझ्याकडे आहे. विरोधकांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी तयारीला लागा आणि विटा पालिका निवडणुकीत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करा. मी व माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा राहील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे बैठकीत दिला.विटा येथे आज, सोमवारी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत विटा पालिकेच्या आजी-माजी नगरसेवकासह कार्यकर्त्यांशी निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा केली.प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, विटा पालिका निवडणुकीत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. मंत्री कोणीही होऊ द्या. तुम्ही सर्व २६ जागा निवडून आणण्यासाठी कामाला लागा.राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष निवडणुकीत ताकतीनिशी उतरणार. मात्र, जनता नेमका कोणाला कौल देणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
Jayant Patil: मंत्री कोणीही होऊ द्या, घाबरू नका; सगळ्यांचा सात-बारा माझ्याकडे - जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 18:34 IST