लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाने हातपाय पसरले आणि जिल्ह्यात गल्लीबोळात कोविड रुग्णालये सुरू झाली. कोरोना म्हणजे अनेकांसाठी पैसे छापण्याची पर्वणीच ठरली. डॉ. महेश जाधवने पर्वणी नेमकी साधली. रुग्णांना मृत्यूच्या दाढेतूून बाहेर काढण्याऐवजी आपला गल्ला कसा भरेल, याकडेच त्याचे लक्ष अधिक होते. उदात्त व्यवसाय (नोबल प्रोफेशन) मानल्या गेलेल्या वैद्यकीय सेवेचा काळा चेहरा म्हणून महेश जाधवचे ॲपेक्स केअर रुग्णालय आता ओळखले जाऊ लागले आहे.
ॲपेक्स केअर रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यूदर कदाचित जिल्ह्यात सर्वाधिक असावा. तब्बल ८९ रुग्णांचे झालेले मृत्यू म्हणजे डॉ. महेश जाधवच्या हव्यासाचेच बळी ठरले आहेत. पैसे मिळवणे हा एकमेव हेतू नजरेसमोर ठेवून सुरू झालेल्या ॲपेक्स केअरच्या बिलांवर जर नजर टाकली असता लुटमार स्पष्ट होते. गांधी चौक पोलिसांत जाधव आणि त्याच्या साथीदारावर गुन्हे दाखल होताच पीडितांना धीर मिळाला. त्याच्याविरोधात तक्रारी देण्यासाठी पोलीस ठाण्यात रीघ लागली. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने एव्हाना ॲपेक्स केअरमधील कत्तलखान्याची पुरती नाकेबंदी केली असली तरी तोपर्यंत ८९ रुग्णांना नाहक जीव गमवावा लागला आहे. त्यातील बहुतांश रुग्ण हलगर्जीपणाचे आणि खाबूगिरीचे बळी ठरले आहेत.
जाधवने सुरू केलेले कोविड रुग्णालय म्हणजे एखादे गोदामच होते. पुरेशा संख्येने स्वच्छ स्वच्छतागृहांचीही तेथे सोय नसल्याचे रुग्णांनी सांगितले. कोरोनाचा कहर उच्चांकी पातळीवर पोहोचला, तेव्हा बेडसाठी प्रत्येक रुग्ण तडफडत होता. त्याचा नेमका फायदा जाधवने उचलला.
चौकट
विश्रामबाग रुग्णालयात दगडफेक
जाधवने विश्रामबागमध्ये भाडोत्री इमारतीत कोविड रुग्णालय सुरू केले. पहिल्या दिवशी रुग्ण दाखल होऊ लागले तरी रुग्णालयात खाटा, कपाटे, टेबल-खुर्च्या अशी तयारी सुरूच होती. डॉक्टर म्हणून वैद्यकीय शाखेच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना जबाबदारी दिली होती. रुग्णांचे लाखमोलाचे जीव नवशिक्या विद्यार्थ्यांच्या हातात सोपवले होते. स्वत: डॉ. जाधव नियमित येत नव्हता, असेही रुग्णांनी सांगितले. यातूनच रुग्णांच्या नातेवाइकांचा उद्रेक झाला आणि रुग्णालयावर दगडफेकही झाली.
चौकट
१ एप्रिलपासूनच्या दुसऱ्या लाटेत ॲपेक्सची लुटमार अशी
दाखल रुग्ण ६०
आकारलेली बिले २५ लाख १८ हजार ६००
प्रत्येक रुग्णासाठी सरासरी रक्कम ४१ हजार ९७७