Mahapur, drought has ruined the economy of the district! | महापूर, दुष्काळामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाची घडीच विस्कटली!
महापूर, दुष्काळामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाची घडीच विस्कटली!

ठळक मुद्दे दोन्ही नैसर्गिक संकटांमुळे जिल्ह्याचे पाच हजार कोटीहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

अशोक डोंबाळे ।
सांगली : दुष्काळी भागात जून, जुलै महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे सव्वालाख हेक्टर क्षेत्रातील काही पिके वाळून गेली. त्यातच वारणा, कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांना महापुराने घेरल्यामुळे ६६ हजार ६९ हेक्टरवरील पिके वाया गेली असून, दोन हजार कोटी रुपयांचा त्यांना फटका बसला आहे. पूर, तसेच दुष्काळामुळे जिल्ह्याची आर्थिक घडीच विस्कटली आहे.

जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, कडेगाव या तालुक्यात पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप, रब्बी हंगाम वाया गेले. मान्सूनपूर्व आणि मान्सूनचे पाऊस झाले नाहीत. याचा खरीप पेरणीवर परिणाम झाला होता. किरकोळ पावसावरच जिल्ह्यातील तीन लाख ४८ हजार ४९० हेक्टर खरीप क्षेत्रापैकी दोन लाख ८६ हजार १२२ हेक्टरवर पेरणी झाली होती. जून ते २० जुलैपर्यंत पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळी भागातील सव्वालाख हेक्टरवरील पिकांनी माना टाकल्या होत्या. माळरानावरील ज्वारी, बाजारी, कडधान्य पीक वाळून गेले होते.

आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यातील ७९ गावे व ६१० वाड्या-वस्त्यांवर अजूनही ९६ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. खरीप पिकांबरोबरच द्राक्ष, डाळिंब बागा वाळून गेल्या.
दुष्काळग्रस्त चारा, पाण्याच्या संघर्षात असतानाच, वारणा, कृष्णा नदीकाठच्या सांगली, मिरज शहरांसह ११६ गावांना महापुराने वेढा टाकला. मिरज पश्चिम, पलूस, वाळवा, शिराळा या तालुक्यांना महापुराचा फटका बसला. कडेगाव तालुक्यात पुरापेक्षा अतिवृष्टीचे नुकसान जास्त होते. जनावरे पुरात वाहून गेली, तर काही दावणीलाच तडफडून मृत्युमुखी पडली. तीन लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले. ६६ हजार ६९ हेक्टरवरील पिके महापुरात भुईसपाट झाली. सुमारे दोन हजार कोटीहून अधिक रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

बागायत क्षेत्राला हेक्टरी १३५०० रुपये, फळबागांसाठी हेक्टरी १८००० आणि जिरायत शेतीसाठी हेक्टरी ६८०० रुपये भरपाई शेतकºयांच्या पदरी पडणार आहे. हेक्टरी लाखो रुपयांचे नुकसान झाले असताना शासनाकडून मिळणा-या मदतीतून शेतातील खराब पिकांची घाणही बाहेर निघणार नाही, अशी परिस्थिती आहे.

पूर्व भागातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना पश्चिमेकडील शेतकरी महापुराच्या संकटात सापडला आहे. दुष्काळ आणि महापूर या दोन्ही नैसर्गिक संकटांमुळे जिल्ह्याचे पाच हजार कोटीहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जिल्ह्याच्या अर्थकारणाची घडीच विस्कटली आहे.


Web Title: Mahapur, drought has ruined the economy of the district!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.