माडग्याळी मेंढी संशोधन अडकले लाल फितीत;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:07 IST2020-12-05T05:07:15+5:302020-12-05T05:07:15+5:30
संख : माडग्याळ (ता. जत) येथील मेंढी संशोधन, पैदास, जतन व संवर्धन केंद्र दोन वर्षापासून शासन दप्तरदिरंगाईच्या लाल फितीत ...

माडग्याळी मेंढी संशोधन अडकले लाल फितीत;
संख : माडग्याळ (ता. जत) येथील मेंढी संशोधन, पैदास, जतन व संवर्धन केंद्र दोन वर्षापासून शासन दप्तरदिरंगाईच्या लाल फितीत अडकले आहे. तत्कालीन पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी घोषणा केली होती, ती हवेतच विरली आहे. मेंढी संशोधन, पैदास जतन व संवर्धन केंद्र सुरू करावे, अशी मागणी पशुपालकांतून होत आहे.
तालुक्यामध्ये शेळ्यांची संख्या एक लाख एक हजार ४३०, तर मेंढ्या ५६ हजार २५९ आहेत. खिलार जनावरांसाठी, माडग्याळ मेंढ्यांसाठी हा तालुका प्रसिद्ध आहे. मेंढपाळांनी ‘माडग्याळ मेंढी’ ही जात विकसित केली आहे. पांढरा रंग व त्यावर तपकिरी रंगाचे भाग, फुगीर नाक, लांब पाय, निमुळती व लांब मान, शिंग नसलेली, काटक व अवर्षण परिस्थितीत टिकण्याची क्षमता ही या मेंढीची वैशिष्ट्ये आहेत. माडग्याळी मेंढीचे जतन, पैदास आणि संवर्धनाचे काम प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. यासाठी मूळ स्थानी माडग्याळ येथे मेंढीचे संशोधन होऊन उत्तम प्रकारच्या प्रजातीही निर्माण व्हाव्यात, अशी मेंढपाळ आणि शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी राष्ट्रीय शेळी-मेंढी संशोधन केंद्र व्हावे, ही फार वर्षांपूर्वीची मागणी आहे. तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व अधिकारी माडग्याळ येथे २०१८ मध्ये दौऱ्यावर आले होते. त्यांनी माडग्याळी मेंढीची पाहणी करून, त्यावेळी घोषणा केली होती. पशुसंवर्धन विभागाने ग्रामपंचायतीकडे प्रस्तावाची मागणी केली होती. ग्रामपंचायतीने खंडोबा मंदिरजवळील जागा दिली आहे. प्रस्ताव पाठविला आहे, पण शासनदरबारी तो दोन वर्षापासून पडून आहे.
चौकट
बाजाराला ५५ वर्षांची परंपरा
माडग्याळचा शेळ्या-मेंढ्यांचा शुक्रवारचा आठवडा बाजार प्रसिद्ध आहे. बाजाराला ५५ वर्षांची परंपरा आहे. माडग्याळी मेंढी, शेळी, बोकड खरेदीसाठी मुंबई, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक येथील व्यापारी बाजारात येतात. कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
रांजणी येथे संवर्धन केंद्र
केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालय व पशुसंवर्धन विभागाचा रांजणी येथे माडग्याळ मेंढी संवर्धन व विकास कार्यक्रम प्रक्षेत्रावर राबविण्यात येत आहे. माडग्याळी मेंढी व नर विकत घेऊन प्रक्षेत्रावर जतन, पैदास, संवर्धन केले जात आहे. माडग्याळी मेंढी संशोधन, संवर्धन केंद्र सुरू करुन पशुपालन व्यवसायाला चालना द्यावी, अशी मागणी पशुपालक सुरेश हाक्के यांनी केली.