कणेगावातील ऊस उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
By Admin | Updated: July 27, 2014 23:01 IST2014-07-27T22:18:42+5:302014-07-27T23:01:59+5:30
रस्ते विकास मंडळाच्या कोल्हापूर कार्यालयाकडे तक्रार करुनहीली दखल नाही,

कणेगावातील ऊस उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
इस्लामपूर : कणेगाव (ता. वाळवा) येथून जाणाऱ्या पुणे—बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिम बाजूस काढलेले नाले तुंबल्यामुळे कृष्णा नदीस पूर आलेले पाणी वाहून जाण्यास अडथळा होत असतो. हा प्रश्न प्रत्येकवर्षी उद्भवतो. त्यामुळे परिसरातील २0 एकर क्षेत्रातील उसात पाणी साचून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. याची अनेकवेळा रस्ते विकास मंडळाच्या कोल्हापूर कार्यालयाकडे तक्रार करुनही दखल घेतली जात नाही, असा आरोप जगन्नाथ रामचंद्र पाटील यांच्यासह १७ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.
कणेगावात जाण्यास केलेल्या भुयारी मार्गात पाणी साचून रहात आहे. त्याचबरोबर अंकुर व उदय सिमेंट पाईप कारखान्यासमोरील नाला बुजला गेल्याने त्याच्या उत्तर बाजूकडील पश्चिम दिशेच्या क्षेत्रातील पाणी वाहून जाण्यास अडथळा झाला आहे. त्यामुळे या क्षेत्रात पाणी साचून राहिले आहे. यामुळे नुकत्याच केलेल्या ऊस लागणीचेही मोठे नुकसान झाले आहे.
या क्षेत्रातील पाण्याची निर्गती न झाल्यास ऊस उत्पादकांना शेती करणे अवघड जाणार आहे. त्यांच्या उपजीविकेचे साधनच संपुष्टात येणार आहे. गट नं. ११९ पासून पाणी विसर्गासाठी नाल्याची तात्काळ दुरुस्ती होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पादचाऱ्यांना जाण्यासाठी निर्माण केलेल्या भुयारी व छोट्या मार्गाचा वापर करताना जीव मुठीत धरुनच जावे लागते. या कणेगावकरांच्या ऊस उत्पादकांचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्यासह आमदार मानसिंगराव नाईक यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)