कारखान्यांबाबत दीर्घ मुदतीचे धोरण ठरवावे

By Admin | Updated: September 28, 2015 23:44 IST2015-09-28T23:18:27+5:302015-09-28T23:44:50+5:30

अरुण लाड : क्रांती कारखान्याची वार्षिक सभा; निश्चित धोरण नसल्यामुळे साखर कारखाने आर्थिक अडचणीत

The long-term policy on the factories should be decided | कारखान्यांबाबत दीर्घ मुदतीचे धोरण ठरवावे

कारखान्यांबाबत दीर्घ मुदतीचे धोरण ठरवावे

कुंडल : शेतकऱ्यांना परवडणारी एफआरपी निश्चित झाली पाहिजे. साखरेचे बाजारपेठेतील दर, साखरेची आयात-निर्यात व इतर बाबी याबाबत योग्यवेळी निर्णय घेतले पाहिजेत. शासनाने साखर उद्योगाबाबत योग्यवेळी दीर्घ मुदतीची योग्य धोरणे राबविल्यास एफआरपीप्रमाणे उसाला दर देता येईल, असे प्रतिपादन क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी केले. कारखान्याच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, शासनाने साखर उद्योगाबाबत योग्यवेळी निर्णय न घेतल्यामुळे साखर उद्योगाला मोठा फटका बसला. देशातील जादा साखर उत्पादनामुळे निर्यात अनुदान देऊन साखर निर्यात करणे गरजेचे होते. साखर कारखाने बंद होत आले असताना साखर निर्यातीचा निर्णय घेतल्याने, कारखाने कच्ची साखर उत्पादन करू शकले नाहीत. शासनाने साखर आयात कर ६० टक्क्यांपर्यंत वाढवायला हवा होता. तो ४० टक्क्यांपर्यंत वाढविला. हा निर्णयही वेळेत न घेतल्याने जागतिक बाजारपेठेतून १२.५ लाख टन साखर आयात झाली. साखरेचा दर २६०० ते २७०० रुपये प्रति क्विंटल असताना, साखरेचा ४० लाख टन बफर स्टॉक करावा, अशी मागणी होती. हा निर्णय न झाल्याने साखरेचा दर कमी होत गेला. गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी निर्यात अनुदान जाहीर केले पाहिजे. कच्च्या व पांढऱ्या साखरेस निर्यात अनुदान दिले पाहिजे. साखर आयात कर ६० टक्क्यांपर्यंत वाढवून ३० ते ४० लाख टन बफर स्टॉक करावा. आसवनी प्रकल्प काढण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा व पेट्रोलमध्ये २५ टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिसळण्याची सक्ती करावी. विद्युत निर्मितीला अनुदान व कर सवलत देऊन गती द्यावी. ब्राझीलप्रमाणे साखर हे मुख्य उत्पादन न राहता दुय्यम उत्पादन राहावे व इतर उत्पादने मुख्य व्हावीत.
संचालक पोपट संकपाळ यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक विजय पाटील व वित्त अधिकारी शामराव जाधव यांनी अहवालवाचन केले. सोपान महाडिक, सुभाष साळुंखे, दिलीप सव्वाशे, धनपाल चौगुले, अनिल लाड, संदीप राजोबा, हिम्मत पवार, शिवाजी मोहिते आदी सभासदांनी सूचना मांडल्या. क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड व बी. के. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी उद्योगपती उदय लाड, जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद लाड, स्वातंत्र्यसैनिक श्रीरंग जाधव, कुंडलिक एडके, आर. एम. पाटील, वसंतराव लाड, जगन्नाथ आवटे, अजित जाधव, कारखान्याचे उपाध्यक्ष भीमराव महिंद, डॉ. योगेश लाड, सुनील सावंत, पांडुरंग होनमाने, डॉ. व्ही. डी. पाटील, सुमनताई गायकवाड उपस्थित होते.
शेती अधिकारी दिलीप पार्लेकर यांनी सूत्रसंचालन केले, संचालक दत्ताजी मोहिते यांनी आभार मानले. (वार्ताहर)

आज ३११ रुपयांचा अंतिम हप्ता जमा
क्रांती कारखाना एफआरपीतील प्रतिटन ३११ रुपयांचा हप्ता मंगळवार, दि. २९ सप्टेंबर रोजी ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा करणार आहे. साखर उद्योगावर आलेल्या अडचणीमुळे पुढील हंगामात एफआरपी तीन टप्प्यात द्यावी लागेल, असेही अरूण लाड यांनी सभासदांना सांगितले.
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी, बफर स्टॉक केला जाणार नाही, असे जाहीर केल्याने साखरेचा दर १९०० रुपये प्रति क्विंटल इतक्या नीचांकी पातळीवर गेला. शासनाच्या धरसोड धोरणाने व उशिराच्या निर्णयाने सर्व कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये येऊ लागले. साखरेच्या कमी झालेल्या दरामुळे उसाला एफआरपीप्रमाणे दर देणे अशक्य झाले. यावर शासनाने ठोस धोरण राबवावे, असेही लाड म्हणाले.

Web Title: The long-term policy on the factories should be decided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.