भ्रष्टाचार निर्मूलन बैठकीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाठ

By Admin | Updated: December 24, 2014 00:21 IST2014-12-23T23:08:32+5:302014-12-24T00:21:12+5:30

नोटिसा पाठविणार : ३२ प्रकरणांवर चर्चा

Lessons of senior officials to the corruption eradication meeting | भ्रष्टाचार निर्मूलन बैठकीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाठ

भ्रष्टाचार निर्मूलन बैठकीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाठ

सांगली : प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याने अशासकीय सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात कारणे दाखवा नोटिसा बजावण्याच्या सूचना प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी प्रशासनाला दिल्या.
जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज (मंगळवार) प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस समितीचे सदस्य दत्तात्रय घाडगे, सौ. छाया पाटील, चंपाताई जाधव, सुरेश गुरव यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीला जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, कार्यकारी अभियंता, जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एन. जाधव आदी वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित होते. त्यांच्याऐवजी त्यांचे प्रतिनिधी आल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होत नाही, निर्णय होत नाही, त्यामुळे बैठका रखडतात, अशी नाराजी सदस्यांनी व्यक्त केली. त्यानंतर याबाबत संबंधिताकडून खुलासा घेण्यासाठी नोटिसा पाठविण्यात येतील, अशी माहिती बेलदार यांनी दिली.
यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक पी. पी. आफळे, पोलीस निरीक्षक निवास साळोखे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. सी. जाधव, महापालिकेचे साहाय्यक आयुक्त रमेश घोलप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, विभागीय वन अधिकारी माणिकराव भोसले, जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक आदी अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

महिन्याच्या आत अहवाल घेणार
समितीकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी अर्जावर संबंधित विभागाने तात्काळ कारवाई करून एका महिन्याच्या आत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे आदेश बेलदार यांनी यावेळी दिले. आजच्या बैठकीत ३२ अर्ज ठेवण्यात आले होते. त्यावर अर्जनिहाय चर्चा करुन संबंधित विभागाचे म्हणणे घेण्यात आले. यामध्ये न्यायप्रविष्ट असणारी प्रकरणे वगळण्याचे समितीने ठरविले. तसेच या समितीच्या कामकाजाचा भाग नसणारी प्रकरणे निकाली काढून ती संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Lessons of senior officials to the corruption eradication meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.