गोरगरिबांच्या पोरांनाही खेळाचे धडे
By Admin | Updated: April 13, 2015 00:03 IST2015-04-12T22:46:08+5:302015-04-13T00:03:51+5:30
तज्ज्ञांचे मार्गदर्शन : क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे मिळणार प्रशिक्षण

गोरगरिबांच्या पोरांनाही खेळाचे धडे
आदित्य घोरपडे - हरिपूर लाल मातीतले अस्सल हिरे गोळा करण्यासाठी सांगलीच्या क्रीडाधिकारी कार्यालयाने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. गोरगरिबांच्या पोरांना खेळाचे धडे देऊन त्यांच्यातील स्पोर्टस् टॅलेंटची कदर करण्यासाठी या कार्यालयाने एक पाऊल पुढे टाकले आहे. खासगी उन्हाळी क्रीडा शिबिरांची भरमसाठ फी मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडत नाही. त्यामुळे इच्छा असूनही मुलांना अशा शिबिरात घालता येत नाही. परिस्थितीअभावी जिल्ह्यातील हे ‘स्पोर्टस् टॅलेंट’ वाया जाऊ नये यासाठी सांगलीचे क्रीडाधिकारी कार्यालय सरसावले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी सर्वप्रथम या शासकीय क्रीडा शिबिराची संकल्पना मांडली. कार्यालयातील कर्मचारी व प्रशिक्षकांच्या साथीने या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवत अंमलबजावणीही झाली. क्रीडाधिकारी कार्यालय व शासकीय जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ते २८ एप्रिलदरम्यान जिल्हा क्रीडा संकुलामध्ये हे शिबिर होणार आहे. शिबिर अनिवासी असून त्याची वेळ सकाळी साडेसहा ते साडेअकरा आणि दुपारी साडेतीन ते सहा अशी आहे.
सहभागी मुलांना टी-शर्ट, शॉर्ट, कॅप, सकाळचा नाष्टा, दूध, सायंकाळी सरबत, फळे व सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे. शिबिरात राष्ट्रीय प्रशिक्षक उमेश बडवे (हॉकी), महेश पाटील (मैदानी), मधुरा सिंहासने (वेटलिफ्टिंग), अभय चव्हाण (बास्केटबॉल), एस. एल. पाटील (मैदानी), भीमराव भांदिगरे (खो-खो), संदीप पाटील (जलतरण), वैशाली शिंदे (क्रिकेट), मंदार मेहंदळे (तलवारबाजी) आदी तज्ज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. एरव्ही ओस पडलेले हे संकुल आता भर उन्हातही खेळाडूंच्या गर्दीने ‘एव्हरग्रीन’ होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात क्रीडाधिकारी कार्यालयाने आयोजित केलेले हे पहिलेच शिबिर आहे. क्रीडापंढरी सांगलीच्या भूमीत होणाऱ्या या प्रयोगातून महाराष्ट्राला दर्जेदार खेळाडू मिळतील, असे मत क्रीडा प्रशिक्षकांतून व्यक्त होत आहे.
समाजातील सर्व स्तरातील मुलांना खेळांचे तंत्रशुध्द प्रशिक्षण घेता यावे यासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. परिस्थितीअभावी खेळापासून वंचित राहिलेल्यांना हे चांगले व्यासपीठ आहे. यातून निश्चितपणे दर्जेदार खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास आहे.
- युवराज नाईक,
जिल्हा क्रीडाधिकारी
या खेळांचे मिळणार धडे...
अॅथलेटिक्स तलवारबाजी
वेटलिफ्टिंग बास्केटबॉल
व्हॉलिबॉल जलतरण
खो-खोक्रिकेट
कबड्डी हॉकी