केदारवाडीत महामार्गावर अपघातात बिबट्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 19:53 IST2020-07-28T19:49:33+5:302020-07-28T19:53:19+5:30
पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील केदारवाडी (ता. वाळवा) हद्दीतील देसाई मळ्याजवळ सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक वर्षाचा बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला. या वर्षाच्या मादी जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर शेतकरी व वाहनधारकांनी गर्दी केली होती. वन विभागाच्या वनरक्षक अधिकारी दीपाली सागावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

केदारवाडीत महामार्गावर अपघातात बिबट्या ठार
नेर्ले : पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील केदारवाडी (ता. वाळवा) हद्दीतील देसाई मळ्याजवळ सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक वर्षाचा बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला. या वर्षाच्या मादी जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर शेतकरी व वाहनधारकांनी गर्दी केली होती. वन विभागाच्या वनरक्षक अधिकारी दीपाली सागावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, हा बिबट्या काळमवाडीच्या दिशेने शेतातून कासेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर आला. रात्री बिबट्या महामार्गावर गेल्यानंतर कोल्हापूरहून येणाऱ्या अज्ञात वाहनाची धडक त्याला बसली. या अपघातात त्याच्या पोटाला, तोंडाला मार लागून कानातून रक्त आले होते. यातच त्याचा मृत्यू झाला.
सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. यात बिबट्या धडपडत रस्त्यावरच्या झाडीत येऊन पडला. या मृत बिबट्यास शिराळा येथे विच्छेदन तपासणीसाठी नेण्यात आले. प्राणीमित्र संतोष औंधकर, केदारवाडीचे सरपंच अमर थोरात यांनी वन विभागास याबाबत माहिती दिली. वनक्षेत्रपाल सुशांत काळे, वनरक्षक दीपाली सागावकर यांच्यासह कासेगाव पोलीस ठाण्याचे संतोष देसाई, अभिजित कारंजकर, शिवाजी यादव उपस्थित होते.
वनक्षेत्रपालाकडून पत्रकाराचा अपमान
घटनास्थळी वनक्षेत्रपाल उशिरा आल्याने बिबट्याचा मृतदेह ताटकळत पडला होता. रात्री १० च्या सुमारास बिबट्या ठार झाला. घटनेनंतर वनक्षेत्रपाल सुशांत काळे पोहोचले. यावेळी ते बिबट्यास हाताळत असताना, पत्रकार फोटो घेऊन माहिती घेत होते. त्यांना, फोटो काढू नका असे म्हणत वनक्षेत्रपालांनी अपमानीत भाषा वापरली. यावेळी त्यांना याबाबत जाब विचारला असता, उत्तर न देता ते निमूटपणे निघून गेले.