एलईडी निविदा मान्यतेचा प्रस्ताव स्थायीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:43+5:302021-07-05T04:17:43+5:30
सांगली : महापालिकेच्या बहुचर्चित एलईडी पथदिवे प्रकल्पाच्या निविदेचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविण्यात आला आहे. पण गेल्या आठवड्यात स्थायीची सभाच ...

एलईडी निविदा मान्यतेचा प्रस्ताव स्थायीकडे
सांगली : महापालिकेच्या बहुचर्चित एलईडी पथदिवे प्रकल्पाच्या निविदेचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविण्यात आला आहे. पण गेल्या आठवड्यात स्थायीची सभाच झाली नाही. एकच विषय असल्याने सभा घेतली नसल्याचे सांगितले जात असले तरी स्थायी सदस्यांच्या अपेक्षांची पूर्ती झाल्याशिवाय या विषयाला मंजुरी मिळणार नसल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.
महापालिका क्षेत्रात ३२ हजार पथदिवे आहेत. राज्य शासनाने ईईएसएल या खासगी कंपनीला एलईडी पथदिवे बसवण्याचा ठेका दिला होता. मात्र कंपनीच्या अटी व शर्तीमुळे महापालिकेला १५ ते २० कोटी रुपयांचा बोजा सहन करावा लागणार होता. त्यामुळे ईईएसएल कंपनीपेक्षा कमी दराने एलईडी दिवे बसवून देणाऱ्याला ठेका देण्याचा ठराव महासभेने केला. त्यास नगर विकासने मान्यता दिली. त्यानुसार निविदा मागविल्या आहेत. तीनदा मुदतवाढ देऊनही दोनच निविदा आल्या होत्या. यात समुद्रा कंपनीची निविदा पात्र ठरली आहे. ई-स्मार्टच्या निविदेतील काही प्रमाणपत्रे मुदतबाह्य होती. त्यामुळे ‘ई-स्मार्ट’ची निविदा अपात्र ठरविण्यात आली आहे.
एलईडी पथदिवे प्रकल्प ६० कोटींचा आहे. प्रशासनाने निविदा मंजुरीचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविला आहे. पण गत आठवड्यात अजेंड्यावर विषय नसल्याने स्थायी समितीची सभा झाली नाही. एलईडीसारखा महत्त्वाचा विषय असतानाही सभा घेण्यात आली नाही. याबाबत पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. स्थायी सदस्यांच्या अपेक्षापूर्तीबाबत कसलीच चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात येत. त्यात महासभेत राष्ट्रवादीची सत्ता तर स्थायीत भाजपचा सभापती आहे. त्यामुळे प्रकल्प मंजुरीवरून दोन्ही पक्षांत कुरघोड्या रंगणार आहे. स्थायी सदस्यांची अपेक्षा पूर्ती झाली तरच हा प्रकल्प मंजुर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
चौकट
फेरनिविदेचाही घाट
स्थायी सदस्यांच्या समाधान व्हावे, यासाठी महापालिकेत फिल्डिंग लावली आहे. पण या सदस्यांशी चर्चा कोण करणार? याचे कोडे उलघडलेले नाही. त्यात अपेक्षापूर्ती न झाल्यास फेरनिविदेचा ठरावही स्थायी समितीत होऊ शकते. तशी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. स्थायीच्या आठ सदस्यांची मुदत ३१ ऑगस्टला संपणार आहे. तत्पूर्वी फैसला अपेक्षित आहे.