विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या आरत्या...

By Admin | Updated: September 4, 2014 00:04 IST2014-09-03T23:39:32+5:302014-09-04T00:04:17+5:30

निमंत्रणांना प्रतिसाद : देवाबरोबरच मतदारांनाही साकडे, उत्सवात वाढला राजकीय उत्साह

Leaders of the Legislative Assembly ... | विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या आरत्या...

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या आरत्या...

सांगली : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच गणेशोत्सव आल्याने सध्या राजकीय उत्साहाला उधाण आले आहे. एकाचवेळी कार्यकर्त्यांच्या रूपातील अनेक मतदारांची भेट आणि त्यांच्यानिमित्ताने देवाला साकडे घालण्याची संधी नेत्यांना मिळत आहे. उत्सवाचा काळ नेत्यांनी मतदारसंघातील मंडळांसाठी राखीव ठेवला असून, देवाच्या निमित्ताने मतदारराजासाठीही आरती ओवाळली जाणार आहे.
सांगली जिल्ह्यात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. गणेश मंडळांचे कार्यकर्ते, त्या त्या भागातील नागरिक उत्सवात दंग आहेत. उत्साहाचे वातावरण सर्वत्र असल्याने त्याचा परिणाम आता राजकीय वातावरणावरही झाला आहे. मंत्री, आमदार आणि आमदारकीसाठी धडपडत असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांचाही सहभाग आता सार्वजनिक उत्सवात वाढला आहे. अर्थात मंडळांकडूनच त्यांना निमंत्रणे दिली जात आहेत. ही निमंत्रणे बहुतांश नेत्यांकडून स्वीकारली जात आहेत. मंडळ व त्यांच्या कार्यकर्त्यांची मर्जी राखण्यातच नेतेपणाचे अस्तित्व असल्याची भावना राजकीय मंडळींच्या मनात आहे. म्हणूनच मंडळांच्या कार्यक्रमांना प्राधान्य दिले जात आहे. सांगली, मिरजेतील नेत्यांमध्ये यासाठी चढाओढ सुरू आहे. या दोन्ही शहरात सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या अधिक आहे.
सांगली, मिरजेप्रमाणेच इस्लामपूर, विटा, कवठेमहांकाळ, शिराळा, जत या तालुक्यांमध्येही गणेश मंडळांच्या आरत्यांसाठी नेत्यांना निमंत्रण दिले जात आहे. मंडळांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची मोठी संधी नेत्यांना चालून आली आहे. गणेशोत्सवानंतर पुन्हा नवरात्रोत्सवही येत आहे. त्यामुळे उत्सवांच्या गर्दीत नेत्यांचा उत्साहसुद्धा मंडळांच्या कार्यकर्त्यांइतकाच वाढत आहे. सांगली व मिरजेतील काही नेत्यांकडे दररोज तीन ते चार मंडळांची निमंत्रणे आहेत. उत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात दररोज पाच-सहा ठिकाणच्या आरत्यांना हजेरी लावावी लागणार आहे. नेत्यांच्या डायरीला मंडळांच्या निमंत्रणांची नोंद करण्यात आली आहे. उत्सव काळात अन्य राजकीय बैठका, मेळावे किंवा कार्यक्रमांना फाटा देण्यात आला आहे. प्राधान्याने उत्सवाकडे लक्ष दिले जात आहे. (प्रतिनिधी)

निवडणुकीच्या तोंडावरच उत्सव आल्याने नेत्यांकडून देणगी वाढली आहे. हसतमुखाने कोणतीही तक्रार न करता नेत्यांकडून देणग्या दिल्या जात आहेत. मंडळांच्या कमानी, महाप्रसाद आणि इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी सढळ हाताने मदत केली जात असल्याचे चित्र आहे.
कमानींवरही नेते
गणेश मंडळांच्या अनेक कमानींवर सध्या इच्छुकांची छायाचित्रे झळकत आहेत. काही नेत्यांनी संस्थेच्या माध्यमातून मंडळांना जाहिरातस्वरुपात मदत केली आहे. त्यामुळे सांगली शहरातील गणेश मंडळांच्या कमानींच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे.

Web Title: Leaders of the Legislative Assembly ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.