मिरज : वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, शिवाजीराव देशमुख, आर. आर. पाटील, पतंगराव कदम यांच्यासारख्या सांगली जिल्ह्यातील नेत्यांनी राज्याच्या राजकारणाला दिशा दिली. विधानसभेत प्रभावीपणे विचार मांडून जनतेसाठी काम करणारे नेते सांगली जिल्ह्याने दिले. हा समृद्ध राजकीय वारसा जपून लोकप्रतिनिधींनी समाजासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मिरजेत केले.मिरजेत जिल्हा समस्त ब्राह्मण समाजातर्फे जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सत्कार नार्वेकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मिरज संस्थानचे गंगाधरराव तथा बाळासाहेब पटवर्धन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजीत देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.नार्वेकर म्हणाले, विशाल पाटील यांच्यासारखे तरुण खासदार जिल्ह्याला मिळाले आहेत. आजवरचा राजकीय वारसा पाहता जिल्ह्याचे भवितव्य उज्ज्वल आहे. राज्याच्या विधिमंडळाची ओळख ही प्रगल्भ लोकप्रतिनिधींमुळे होत असते. असेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील ब्राम्हण समाजाने प्रभाव निर्माण केला. त्यांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय देण्याचे धोरण असल्याचे सांगितले. किशोर पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले.इतरांना शिव्या देऊन मोठे व्हायची फॅशनसद्या इतरांना शिव्या देऊन समाजात मोठे व्हायची फॅशन सुरू झाली आहे. एखाद्या समाजाबद्दल द्वेष व्यक्त करणे चुकीचे आहे. आपण सगळे मराठी आहोत. पाचशे वर्षांपूर्वीचा हजार वर्षांपूर्वीचा दावा काढून एखाद्याला जोडत बसायचं हे अयोग्य असल्याचेही आमदार जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
सांगली जिल्ह्यातील नेत्यांकडून राज्याच्या राजकारणाला दिशा - राहुल नार्वेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 17:14 IST