एलबीटी वसुली साडेपाच कोटींकडे!
By Admin | Updated: December 25, 2014 00:09 IST2014-12-24T22:29:07+5:302014-12-25T00:09:37+5:30
व्यापाऱ्यांचा प्रतिसाद : महापालिकेला दिलासा

एलबीटी वसुली साडेपाच कोटींकडे!
सांगली : राज्य शासनाने एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कर वसुलीची चिंता सतावत होती. पण डिसेंबर महिन्यातही व्यापाऱ्यांनी कर भरण्यास प्रतिसाद देत आतापर्यंत चार कोटी ३८ लाखांची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. या महिनाअखेरपर्यंत आणखी एक कोटी रुपयांची भर पडेल, असे एलबीटी अधीक्षक एस. जी. मुजावर यांनी सांगितले. या महिन्यात कर वसुली समाधानकारक झाल्याने पालिकेला दिलासा मिळाला आहे.
महापालिका क्षेत्रात दीड वर्षापूर्वी एलबीटीची अंमलबजावणी सुरू झाली. तेव्हापासून पालिका व व्यापाऱ्यांतील संघर्ष कायम आहे. एलबीटीविरोधी कृती समितीने कर भरण्यास नकार देत असहकार आंदोलन पुकारले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मात्र पालिकेने एलबीटीच्या वसुलीसाठी कडक पावले उचलली. सुमारे ५३ व्यापाऱ्यांवर न्यायालयात फौजदारी दाखल केली
त्यातच शासनाच्या एलबीटी रद्दच्या घोषणेनंतर आतापर्यंतची वसुलीवर फारसा परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. गेल्या तीन दिवसांत सुमारे दोन कोटीच्या आसपास एलबीटी जमा झाला आहे. आतापर्यंत चार कोटी ३८ लाखांची वसुली झाली असून, महिनाअखेरपर्यंत आणखी एक कोटीची वसुली होईल. त्यामुळे पालिकेला थोडासा दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)
प्रशासनाची कोंडी
पालिकेच्या फौजदारीविरोधात व्यापाऱ्यांनी बेमुदत उपोषण हाती घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तांना दूरध्वनीवरून कारवाई थांबविण्याचे निर्देश दिले. पण लेखी आदेश नसल्याने कारवाई करायची की नाही, अशी पालिकेची कोंडी झाली आहे.