वनक्षेत्रातील गवत घेण्याचा कायदा करणार
By Admin | Updated: August 10, 2015 00:50 IST2015-08-10T00:50:17+5:302015-08-10T00:50:17+5:30
हंसराज अहिर : गवळी समाजाच्या मेळाव्यात ग्वाही

वनक्षेत्रातील गवत घेण्याचा कायदा करणार
सांगली : चारा नसल्यामुळेच जनावरे कत्तलखान्याकडे जातात. हे रोखण्यासाठी वनक्षेत्रातील गवत कापण्यास परवानगी देणारा कायदा लवकरच करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय रसायन व खत राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली.
येथील भावे नाट्यमंदिरमध्ये रविवारी गवळी समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी अहिर बोलत होते. अध्यक्षस्थानी समाजाचे प्रदेशाध्यक्ष किसन गवळी होते. यावेळी खा. संजय पाटील, आ. सुधीर गायकवाड आदी उपस्थित होते.
अहिर म्हणाले की, गवळी समाजाने शिक्षणाची कास धरून आपली प्रगती करावी. केवळ नोकरीच्या मागे लागून वेळ वाया न घालवता स्वत:चा उद्योग उभारावा. दुभत्या जनावरांची संख्या घटत चालल्याने गवळ्यांचा दुधाचा व्यवसाय धोक्यात आला आहे. याला कारण जनावरांना चारा उपलब्ध नसणे हे आहे.खा. संजय पाटील म्हणाले की, गवळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आपण आवाज उठवू. आ. गाडगीळ म्हणाले, गवळी समाजाच्या न्याय्य मागण्या असून, यासाठी आपण शासकीय दरबारी प्रयत्न करू. स्वागत जिल्हाध्यक्ष नारायण गवळी यांनी केले. यावेळी अशोक मंडले, हिरामण गवळी आदींनी मनोगत व्यक्त केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार, भालचंद्र हुच्चे, लक्ष्मणराव नवले, माजी महापौर शैलजा नवलाई, मारुती नवलाई आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शेती उद्ध्वस्त होते...
रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापराने भारतातील शेती उद्ध्वस्त होत असून, यापुढे शेती टिकवण्यासाठी शेणखताचा वापर होणे नितांत गरजेचे आहे, अशी माहिती अहिर यांनी दिली. रासायनिक खताने आरोग्याबरोबर शेतीही खराब होत आहे. शेणखताचा वापर सुरू केल्यास पशुधन वाढण्यात मदत होणार आहे.