अवकाळीने रब्बीला जीवदान
By Admin | Updated: November 21, 2014 00:30 IST2014-11-20T22:34:11+5:302014-11-21T00:30:06+5:30
कवठेमहांकाळ तालुका : द्राक्ष, डाळिंब बागांचे मात्र मोठे नुकसान

अवकाळीने रब्बीला जीवदान
कुची : कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष, डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, मका आदी पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यात रब्बी पिकांच्या ७८ टक्के पेरण्या झाल्या आहेत.
संपूर्ण तालुक्यासह तालुक्यात आलेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष, डाळिंब बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदरच दावण्यासह इतर रोगांचा सामना करताना द्राक्ष, डाळिंब बागायतदार मेटाकुटीस आले होते. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, असी मागणी त्यांच्याकडून होत आहे.
दुसरीकडे या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पिके जोर धरू लागली आहेत. तालुक्यात ७८ टक्के पेरण्या झाल्या असून, सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रब्बीच्या पेरणी क्षेत्रात आणखी वाढ होणार आहे.
अद्याप गहू, मका, हरभरा पिकांच्या पेरणी क्षेत्रात वाढ होऊ शकते. यावर्षी मका पिकाची पेरणी सर्वात जास्त झाली असून, अजून १०० हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तालुक्यामध्ये अवकाळीच्या नैसर्गिक संकटाने एकीकडे प्रचंड नुकसान, तर दुसरीकडे जीवदान असे चित्र दिसत आहे. (वार्ताहर)
तालुक्यातील पेरणीची सद्यस्थिती
पिके सर्वसाधारण क्षेत्र पेरणी क्षेत्र
ज्वारी १८७८३ हेक्टर १५0२0 हेक्टर
गहू १६00 ९३१
मका ८४९ १४४१
हरभरा २१५४ १२५६
सूर्यफूल १00 00
करडई ३५0 २७
गळीत धान्ये १३0 ३२