...अखेर सेविकेने सोडली सदनिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2015 21:45 IST2015-08-31T21:45:01+5:302015-08-31T21:45:01+5:30
जिल्हा परिषद सभेत वादाचा मुद्दा : घरभाडे वसुलीची नागरिकांतून मागणी--लोकमतचा दणका

...अखेर सेविकेने सोडली सदनिका
प्रमोद रावळ -आळसंद -खानापूर तालुक्यातील वेजेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात असलेल्या वासुंबे उपकेंद्रातील अनिता बाबूराव दौंड या आरोग्य सेविकेने अखेर विटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची अनधिकृत वापरात असलेली सदनिका सोडली. या आरोग्य सेविकेच्या सदनिकेचा विषय जिल्हा परिषदेच्या सभेत गाजला होता. त्यामुळे अखेर या आरोग्य सेविकेला विट्यातील सदनिका सोडावी लागली असली, तरी या आरोग्य सेविकाचा मुक्काम मुख्यालयात नसून, विट्यातच भाडोत्री घरात असल्याची चर्चा सुरू आहे.वेजेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील वासुंबे उपकेंद्रात नेमणूक असलेली अनिता दौंड ही आरोग्य सेविका वासुंबे येथे न राहता विट्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सदनिकेत अनधिकृत व नियमबाह्य वास्तव्यास होती. त्यामुळे ही सदनिका सोडण्यासाठी वरिष्ठ पातळीपासून प्रयत्न करण्यात आले. परंतु, दौंड यांनी एका महिला मंत्र्यांच्या नावाचा वापर करून वरिष्ठांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचाही त्रास वाढला गेला. त्यामुळे या आरोग्य सेविकेला वासुंबे येथे स्थायिक करण्यासाठी व विट्यातील सदनिका सोडण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. परिणामी, आरोग्य कर्मचाऱ्यांतही प्रचंड नाराजी पसरली. हा वाद जिल्हा परिषदेच्या सभेत गेला. जि. प. सदस्य सुरेश मोहिते व फिरोज शेख, डॉ. नामदेव माळी या सदस्यांनी हा विषय चांगलाच ताणून धरल्याने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निर्णय घ्यावा लागला. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष जोशी यांनी दौंड यांना नोटीस बजावून तातडीने सदनिका सोडण्याचा आदेश दिला. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य सुरेश मोहिते, फिरोज शेख यांनी मुख्यालय सोडून नियमबाह्य सरकारी निवासस्थानाचा वापर करणाऱ्या दौंड या आरोग्य सेविकेकडून घरभाडे वसूल करावे, अशी मागणी जि. प. सभेत केली होती. याची दखल घेवून प्रशासनाने कारवाई केली.
‘लोकमत’चे अभिनंदन
या प्रकाराचा ‘लोकमत’ने भांडाफोड केला होता. दि. १३ आॅगस्टला ‘वासुंबे उपकेंद्रातील आरोग्य सेविकेची विट्यात दबंगगिरी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द होताच हा विषय जिल्हा परिषदेच्या सभेत चांगलाच गाजला. त्यामुळे अखेर दौंड या आरोग्य सेविकेने विट्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सदनिकेतील आपला नियमबाह्य मुक्काम हलविल्याने ‘लोकमत’चे अभिनंदन होत आहे.