सांगली : सांगली-कोल्हापूर रस्त्याच्या रुंदीबाबतचा गोंधळ अखेर संपला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला २०१५ मधील कब्जेपट्टी व नकाशे मिळाले असून रस्ता ३५ मीटर रुंदीसाठी भूसंपादन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या संपादनावेळी १०८ भूधारकांनी कब्जेपट्टी दिली होती आणि त्यावर कोणतीही हरकत नोंदविली नव्हती.महापालिकेने आज अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरू करण्याचा प्रयत्न केला असता काही राजकीय नेत्यांनी आडकाठी केली. त्यामुळे काही काळ वातावरण तापले. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी व्यापाऱ्यांशी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव शमला.कृती समितीच्या पाठपुराव्यामुळे भूमी अभिलेख व बांधकाम विभागाने कब्जेपट्टी, नकाशे आणि कागदपत्रांची खात्री करून रस्त्याची अधिकृत रुंदी ३५ मीटर असल्याचे स्पष्ट केले आहे. बांधकाम विभागाकडे मिळालेल्या कब्जेपट्टीत म्हटले आहे की, दिनांक ३ नोव्हेंबर २०१५ अन्वय जाहीर केलेला अंतिम निवाडा व कलम १२ (२) चे नोटीसप्रमाणे मौजे-सांगली, तालुका मिरज (जि. सांगली) येथील संपादनाचे प्रयोजन शिरोली, हातकणंगले, जयसिंगपूर, अंकली चौपदरीकरण कामासाठी संपादन केलेल्या जमिनी कलम १६ प्रमाणे कब्जा कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे देण्यात आल्या आहेत. संपादन केलेल्या जमिनीची प्रत्यक्ष पाहणी करून खुणा व कागदपत्रांची खात्री करण्यात आल्याचे नमूद आहे. तसेच कब्जेवेळी कोणाचीही हरकत अथवा तक्रार नसल्याचेही उल्लेख आहे. १०८ भूधारकांनी कब्जेपट्टी दिल्याचा उल्लेख आहे. आता हा रस्ता ३५ मीटरने रुंद करण्यात यावा, अशी मागणी मागणी सर्वपक्षीय कृती समितीची आहे.सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर म्हणाले की, ‘डीपीमध्ये तातडीने बदल करून अतिक्रमणे काढण्याची प्रक्रिया सुरू करावी आणि रस्ता पूर्ण ३५ मीटर रुंदीने करावा.
कोल्हापूर-सांगली रस्त्यासाठी ३५ मीटरने भूसंपादन, अतिक्रमण पथकाशी वादावादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 11:37 IST