सांगली जिल्ह्यातील ७८ हजारांवर लाडक्या बहिणींचे पैसे बंद, अर्ज रद्द करण्याची कारणे काय.. जाणून घ्या

By अशोक डोंबाळे | Updated: March 8, 2025 14:02 IST2025-03-08T14:01:59+5:302025-03-08T14:02:42+5:30

राज्य शासनाकडून जिल्ह्यासाठी आली यादी : साडेसहा हजार लाभार्थ्यांच्या खात्यांवर होणार पैसे जमा

ladki bahin money stopped at 78 thousand in Sangli district | सांगली जिल्ह्यातील ७८ हजारांवर लाडक्या बहिणींचे पैसे बंद, अर्ज रद्द करण्याची कारणे काय.. जाणून घ्या

सांगली जिल्ह्यातील ७८ हजारांवर लाडक्या बहिणींचे पैसे बंद, अर्ज रद्द करण्याची कारणे काय.. जाणून घ्या

अशोक डोंबाळे

सांगली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील सात लाख ४० हजार लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते. या अर्जाची पडताळणी करण्याचे काम सध्या सुरू असून, यात ७८ हजार ४७८ लाडक्या बहिणींच्या अर्जात त्रुट्या व ते निकषात बसत नसल्याने रद्द होणार आहेत. त्यामुळे आता सहा लाख ६१ हजार ५२२ लाडक्या बहिणींच्या खात्यावर ८ मार्चला दोन हप्त्यांचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

महिला दिनाचे औचित्य साधून राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जानेवारी आणि फेब्रुवारी, अशा दोन महिन्यांचे तीन हजार रुपयांचे अनुदान ८ मार्चला जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचीच सध्या प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एकूण सात लाख ४० हजार लाभार्थी होते. मात्र, सुरुवातीला या योजनेसाठी पात्र नसलेल्या अनेक लाभार्थ्यांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला होता.

ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाने अर्जाची पडताळणी करण्याचे आदेश महिला व बाल विकास विभागाला दिले आहेत. त्यात चारचाकी असणारे लाभार्थी, नोकरीवर असलेल्या, आयकर भरणाऱ्या आणि लग्न होऊन दुसऱ्या राज्यात गेलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या नियमाने अपात्र होणाऱ्या ७८ हजार ४७८ लाडक्या बहिणींची संख्या आहे. तसेच जवळपास ७५ लाभार्थी कारवाईच्या भीतीने अनुदान नको, म्हणून या महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज करीत आहे, तर काही अर्जामध्ये पडताळणींमध्ये त्रुट्या आढळल्या.

लाडक्या बहिणींचे या कारणांमुळे अर्ज रद्द

  • बँकेच्या पासबुकमध्ये डबल नाव : ११६६
  • एका प्रोफाईलवरून ५००, १००० पेक्षा जास्त अर्ज भरणे : ५७१९२
  • लाभार्थ्यांकडे चारचाकी वाहन : २०१२०


२० हजार बहिणींकडे चारचाकी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे. त्यात २० हजार १२० लाडक्या बहिणींकडे चारचाकी वाहने असल्याचे पुढे आले. त्यामुळे त्यांचे अर्ज रद्द होणार आहेत. काही अर्जाची पुन्हा पडताळणी केली जात असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
चौकट

बहिणींनी सोडला लाभ

लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांपैकी नोकरीवर असलेल्या व अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या ७५ लाडक्या बहिणींनी आतापर्यंत योजनेचा लाभ सोडण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडे अर्ज केले आहेत.

७८ हजारांवर अर्जाची पडताळणी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सात लाख ४० हजार महिलांनी अर्ज केले होते. आता शासनाने ठरवून दिलेल्या निकषाच्या आधारावर या सर्व अर्जांची पडताळणी करण्याचे काम शासनाकडे चालू आहे. राज्य शासनाकडूनच दुबार नाव, चारचाकी, आयकर भरणारे अशा ७८ हजार ४७८ अर्ज आले होते. हे सर्व अर्ज तालुकास्तरावर पाठविले असून, छाननी करून ते अर्ज रद्द होणार आहेत, अशी माहिती महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: ladki bahin money stopped at 78 thousand in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.