मिरज : मालगाव (ता. मिरज) तानंग रस्त्यावर बहादूर चाँद देसाई (वय ५४, रा मालगाव) या मजुराचा डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून खून करण्यात आला. बहादूर देसाई यांचे गावातील काही जणांबरोबर भांडण झाले होते. यातूनच त्यांचा खून झाल्याचा संशय आहे. खूनप्रकरणी पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.बहादूर देसाई हे शेतमजुरीचे काम करीत होते. गुरुवारी सकाळी नऊ वाजता नेहमीप्रमाणे ते कामासाठी बाहेर पडले. सकाळी ११ वाजता कळंबी कालव्याच्या पिछाडीस तानंग रस्त्याकडेला देसाई यांचा मृतदेह आढळला. नातेवाइकांनी पाहिले असता मृत बहादूर यांच्या अंगावर जखमा होत्या. तोंडातून रक्त आल्यामुळे त्यांचा मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. बहादूर देसाई यांचे सहा महिन्यांपूर्वी गावात किरकोळ कारणावरून भांडणात त्यांना बेदम मारहाण केल्याने बहादूर यांनी एकावर ब्लेडने वार केले होते. त्यानंतर दोन गटांत ग्रामीण पोलिसांत तक्रारी झाल्या होत्या. या कारणावरून त्यांना मारहाण करून त्यांचा खून केल्याचा संशय आहे. मृत बहादूर यांची पत्नी व मुलगा पुणे येथे वास्तव्यास असल्याने ते गावात एकटेच राहत होते. मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.
डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाणीमुळे मोठी जखम होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौकशीसाठी मालगावातील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांकडून चर्चेची पडताळणीमृत बहादूर देसाई यांनी दोन अनोळखी व्यक्तींकडे दारूसाठी पैसे मागितले. त्यावरून त्यांच्याशी वाद झाला होता. यातूच त्या दोघांनी बहादूर यांना शिवीगाळ करीत काठीने व लाथाबुक्क्याने मारहाण करून खून केल्याची चर्चा गावात सुरू होती. या चर्चेचीही पडताळणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.