मिरज : मिरजेत किल्ला भागात मंगळवारी दुपारी इमारतीचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून सात मजूर गाडले गेले. अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर आहे. उर्वरित पाच मजूरही जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.किल्ला भागात कासीम मणेर यांच्या खुशी पार्क-वन या २४ मजली अपार्टमेंटचे बांधकाम सुरू आहे. इमारतीच्या पायाचे काम सुरू असून या इमारतीच्या तळघराभोवती सुमारे पाच फूट उंचीची सिमेंट विटांची तटभिंत बांधली जात होती. काम सुरू असतानाच भिंतीचा मोठा भाग अचानक कोसळला. यावेळी तेथे असलेले सात मजूर ढिगाऱ्याखाली दबल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. यावेळी तेथे सुमारे २५ मजूर काम करत होते. साथीदार मजुरांनी आरडाओरड सुरू करताच इतर कामगार व स्थानिकांनी धाव घेऊन हाताने विटा, माती बाजूला करत त्यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. यावेळी सिमेंट-विटा अंगावर पडून भीमाप्पा सिद्धाप्पा मेटलकी (वय ४५, रा. बेक्केरी, ता. रायबाग) यांचा मृत्यू झाला. केदारे रायाप्पा निगनूर (वय ४५ रा. सुतट्टी, ता. रायबाग) हा गंभीर जखमी झाला असून, त्यास भारती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मायाप्पा भूपाल बदामी (३६ रा. सुतट्टी, ता. रायबाग) भीमाप्पा रायाप्पा पाटील (४८ रा. कब्बूर, ता. चिकोडी), मुत्त्यापा लगमान्ना माळेकर (३०, रा. बेक्केरी, ता. रायबाग), बिराप्पा सत्यप्पा करगणी (३५, रा. सुतट्टी, ता. रायबाग), सहदेव यमनाप्पा मदार (३५, रा. शहापूर, ता. हुक्केरी) या अन्य पाच जखमी मजुरांवर मिरज सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत.कर्नाटक सीमाभागातील कागवाड, रायबाग, चिकोडी, हुक्केरी तालुक्यातील मजूर बांधकाम कामगार म्हणून कामासाठी दररोज मिरजेत येतात. भीमाप्पा सिद्धाप्पा मेटलकी या मजुरास पाचशे रुपये रोजंदारीवर कामाला आणले होते. परंतु, दुर्घटनेत त्याचा जीव गेला.
रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांचा आक्रोशभीमाप्पा याच्या मृत्यूचे वृत्त समजताच त्याच्या कुटुंबीयांनी मिरज सिव्हिलमध्ये धाव घेतली. कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. ढिगाऱ्याखाली सापडल्याने केदारी निंगनूर या मजुराचीही प्रकृती गंभीर आहे. या सर्व मजुरांचे मूळ गाव कर्नाटकात असून, त्यांना इमारतीच्या बांधकामासाठी पाचशे रुपये पगारावर कामावर आणले होते.
पोलिसांत गुन्हा दाखलअतिरिक्त पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, निरीक्षक किरण रासकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरक्षा साधनांचा अभावउदरनिर्वाहासाठी आलेल्या या गरीब मजुरांपैकी भीमाप्पाने प्राण गमावला. रोजच्या दोन वेळच्या भाकरीसाठी आलेल्या गरीब मजुराने अपघातात जीव गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बांधकाम करताना या कामगारांकडे आवश्यक सुरक्षा साधने नसल्याने त्याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले.