कुपवाडात ४० किलो गांजा जप्त
By Admin | Updated: July 27, 2014 00:31 IST2014-07-27T00:26:49+5:302014-07-27T00:31:42+5:30
दोघास अटक : पोलिसांची कारवाई, चार दिवस कोठडी

कुपवाडात ४० किलो गांजा जप्त
कुपवाड : येथील प्रकाशनगरमधील गांजा अड्ड्यावर आज कुपवाड एमआयडीसी पोलिसांकडून छापा टाकण्यात आला. या छाप्यात २ लाख रूपये किमतीचा चाळीस किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. कारवाईत दोघा गांजा विक्रेत्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोहंमद फारूक इस्माईल नदाफ (वय ३५, रा. प्रकाशनगर), रफिक साहेबलाल शिरढोणे (२८, रा शास्त्री चौक, मिरज) यांचा समावेश आहे. तीन दिवसांपूर्वी कुपवाड पोलिसाकडून शहरातील गांजा विक्रीच्या अड्डयावर छापा टाकण्यात आला होता. त्यात ४० किलो गांजा जप्त करण्यात आला होता.
यावेळी सौ़ शालाबाई शामराव माने व सौ़ सुवर्णा शिवाजी माने या दोघींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून माहिती मिळाल्यावर पोलिसांनी मिरजेतील शिरढोणे यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी त्याने प्रकाशनगर येथील नदाफ या गांजा विक्रेत्याचे नाव घेतले. त्यावरून पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे, सहायक पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याला सोबत घेऊन त्वरित प्रकाशनगरमधील नदाफच्या अड्ड्यावर छापा टाकला़
त्यानंतर नदाफच्या घराची व वाहनाची झडती घेतली़ या कारवाईत त्याच्या दुचाकीमधून पाच किलो गांजा जप्त केला. तसेच घरामधून ३५ किलो गांजा जप्त केला. त्याची बाजारातील किंमत दोन लाख रूपये असल्याचे सांगितले. कारवाईमधील शिरढोणे याला ३० जुलैपर्यंत कोठडी मिळाली आहे. तर नदाफ यास उद्या (रविवारी) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. (वार्ताहर)