कुपवाड आॅक्सिडेशन पॉँडचा ठराव रद्द

By Admin | Updated: March 27, 2015 00:48 IST2015-03-27T00:48:34+5:302015-03-27T00:48:34+5:30

योजना बारगळणार : राष्ट्रवादीकडून आंदोलनाचा इशारा, नगरसेवकांत असंतोष

Kupwad Oxidation Pond resolution canceled | कुपवाड आॅक्सिडेशन पॉँडचा ठराव रद्द

कुपवाड आॅक्सिडेशन पॉँडचा ठराव रद्द

सांगली : कुपवाड शहरातील ड्रेनेज योजना पुन्हा एकदा रखडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या योजनेच्या आॅक्सिडेशन पाँडची जागा खरेदीचा ठराव महापौर विवेक कांबळे यांनी रद्दबातल केला आहे. त्यामुळे कुपवाडकर नगरसेवकांत असंतोष पसरला असून, राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरांचा डाव हाणून पाडू, असे सांगत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महापालिकेचे विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले की, सांगली व मिरजपाठोपाठ कुपवाड शहरातील ड्रेनेज योजनेचा प्रस्ताव शासनदरबारी मान्यतेसाठी पाठविला होता. पण योजनेला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. योजनेच्या प्रस्तावात काही त्रुटी होत्या. त्यात आॅक्सिडेशन पाँडची जागा निश्चित नव्हती. महापालिकेने मिरज हद्दीतील सर्व्हे नंबर ८६५ ते ८६७ मधील पाच एकर जागा खासगी वाटाघाटीने खरेदी करण्याबाबत आयुक्तांच्या दालनात गटनेते किशोर जामदार, नगरसेवक विष्णू माने यांच्यासह मलनिस्सारण अधिकारी, जीवन प्राधिकरण, नगररचनाकार यांची बैठक झाली.
या बैठकीत जागा खरेदीचा निर्णय घेत मालकाला १ कोटी ७५ हजार रुपयांची भरपाई देण्यावरही चर्चा झाली. तसा प्रस्ताव तयार करून १७ जानेवारी २०१५ च्या महासभेत पाठविण्यात आला. सभेत या ठरावाला सर्वच सदस्यांनी मान्यता दिली होती.
त्यानंतर कार्यवृत्त मंजूर झाले असताना आता महापौर कांबळे यांनी जागामालकाचे नाव नसल्याचे कारण देत खरेदीचा विषय रद्द ठरविला आहे. तसा अधिकार महापौरांना आहे का? असा सवाल करून ते म्हणाले की, या निर्णयामुळे कुपवाडवासीयांवर अन्याय होणार आहे. महापौर विवेक कांबळी नेहमीच कायद्याची भाषा बोलत असतात मग आता कार्यवृत्त मंजूर झाले असताना ठराव पुन्हा रद्द करून तेच नियमांचा भंग करीत आहेत. नागरिक व नगरसेवकांना एकत्र करून महापौर हा डाव हाणून पाडू. (प्रतिनिधी)
 

Web Title: Kupwad Oxidation Pond resolution canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.