कृष्णप्रकाश यांचा जयंतरावांवर निशाणा
By Admin | Updated: June 18, 2016 00:14 IST2016-06-18T00:10:14+5:302016-06-18T00:14:51+5:30
फेसबुकवर पोस्ट : लॉटरी घोटाळ्यातून वादाचा दुसरा अंक; सांगलीतील उट्टे काढण्याचा प्रयत्न

कृष्णप्रकाश यांचा जयंतरावांवर निशाणा
सांगली : लॉटरी घोटाळ्यात माजी अर्थमंत्री व आमदार जयंत पाटील यांच्यावर माजी सनदी अधिकारी आनंद कुलकर्र्णी यांनी थेट आरोप केल्यानंतर आता विशेष पोलिस महानिरीक्षक व सांगलीचे तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख कृष्णप्रकाश यांनी निशाणा साधला आहे. ‘लॉटरी घोटाळा राज्यातील जनतेसमोर आल्याचं समाधान वाटतं’, अशी पोस्ट कृष्णप्रकाश यांनी फेसबुकवर टाकून लॉटरीद्वारे कसा पैसा उकळला गेला, याचा तपशीलही दिला आहे. यातून त्यांनी सांगलीतील उट्टे पुरेपूर काढण्याचा प्रयत्न केला आहे. कृष्णप्रकाश २००६ ते २००९ या काळात सांगलीचे जिल्हा पोलिसप्रमुख होते. या काळात त्यांचे जयंत पाटील यांच्याशी अनेकदा वाद झाले होते. सप्टेंबर २००९ मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला मिरजेत दंगल उसळली होती. या दंगलीचे लोण सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातही पसरले होते. त्यावेळी जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपद होते. दंगलीच्या तपासादरम्यान कृष्णप्रकाश यांनी सूत्रधारापर्यंत माग काढल्याचा दावा केला होता. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुकीनंतर दिवंगत आर. आर. पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपद गेले. त्यांचे कृष्णप्रकाश यांना पाठबळ होते. मात्र, कार्यकाळ पूर्ण होताच कृष्णप्रकाश यांची बदली झाली. बदली होताच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधून, मिरजेतील दंगलीचा सूत्रधार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान असल्याचा गौप्यस्फोट केला होता. बागवान हे जयंत पाटील यांच्या अत्यंत निकटचे कार्यकर्ते असल्याने कृष्णप्रकाश यांनी जाता-जाता दंगलीच्या सूत्रधाराचे नाव जाहीर करून पाटील यांना धक्का दिला होता. मात्र कृष्णप्रकाश यांनी राजकीय हेतूने बागवान यांचे नाव गोवल्याचा दावा पाटील यांनी केला होता.चार दिवसांपूर्वी माजी सनदी अधिकारी कुलकर्णी यांनी जयंत पाटील यांच्यावर लॉटरी घोटाळ्याबाबत आरोप केला होता. त्यावर राज्यभर उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, शुक्रवारी कृष्णप्रकाश यांनी या प्रकरणात उडी घेतली. सांगलीत पोलिसप्रमुख असताना पाटील यांच्याशी उडालेल्या खटक्यांचे उट्टे त्यांनी यातून पुरेपूर काढल्याची चर्चा सुरू झाली आहे.
वादाची ठिणगी पडली
जयंत पाटील यांच्याकडे २००९ मध्ये आठ महिने गृहमंत्रिपद होते. त्या काळात कृष्णप्रकाश सांगलीत होते. एकेकाळचा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड व राष्ट्रवादीचा नगरसेवक दाद्या सावंत नेहमी पाटील सांगलीत आले की, त्यांच्यासोबत असे. एकदा पाटील पोलिस मुख्यालयात कामानिमित्त गेले होते. त्यावेळी ते कृष्णप्रकाश यांच्या कार्यालयात गेले. त्यावेळीही दाद्या सावंत त्यांच्यासोबत तेथे गेला होता. ही बाब कृष्णप्रकाश यांना खटकली होती. तेथूनच पाटील व कृष्णप्रकाश यांच्यात वादाची ठिणगी पडली. गृहमंत्री असलेल्या जयंत पाटील यांनी दाद्या सावंतला कृष्णप्रकाश यांच्या कार्यालयात नेल्याबाबत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. डॉ. पतंगराव कदम यांच्याकडे बोट करून मुंडे यांनी, ‘कदमसाहेब, दाद्या सावंत कोण आहे?’ असा प्रश्न केला होता. त्यावर पतंगरावांनी तो गुंड असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. (प्रतिनिधी)
कृष्णप्रकाश यांची पोस्ट
आॅनलाईन लॉटरी सोडतीच्या मर्यादेचे सर्रास उल्लंघन झाले आहे, असा दावा सध्या मुंबईत कार्यरत असलेल्या कृष्णप्रकाश यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टद्वारे केला आहे. लॉटरी किती अंकी असावी, याचेही बंधन पाळले नसून, लॉटरीद्वारे कसा पैसा उकळला गेला, याचा तपशीलच त्यांनी या पोस्टवरून दिला आहे. कृष्णप्रकाश बुलडाण्याचे पोलिसप्रमुख असताना त्यांनी या लॉटरी घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता, पण त्यानंतरही शासनाने हा घोटाळा दडपून टाकला, असा आरोप आनंद कुलकर्णी यांनी केला आहे.