Krishnakath's Idol becomes Nitin, saving thousands of lives | हजारोंचे जीव वाचविणारा नितीन बनला कृष्णाकाठचा आयडॉल
हजारोंचे जीव वाचविणारा नितीन बनला कृष्णाकाठचा आयडॉल

ठळक मुद्दे हजारोंचे जीव वाचविणारा नितीन बनला कृष्णाकाठचा आयडॉलप्रशासनाच्या बोटी येण्यापूर्वीच साडेतीन हजार लोकांना काढले बाहेर

शरद जाधव 

भिलवडी : कृष्णा नदीला महापूर आला... मगरीने हल्ला केला... असे कोणतेही कारण असो, नागठाणे ते डिग्रज बंधारा या तीस किलोमीटरच्या नदीकाठच्या गावांतून एकाच व्यक्तीला फोन लावला जातो आणि काही कालावधितच हा जिगरबाज बोट घेऊन हजर होतो. नितीन गुरव हे त्याचे नाव.

भुवनेश्वरवाडी (भिलवडी, ता. पलूस) हे त्याचे गाव. कृष्णा नदीच्या महापुरात या पठ्ठ्याने भिलवडी, धनगाव, भुवनेश्वरवाडी या गावातील साडेतीन हजार लोकांना प्रशासनाच्या बोटी येण्यापूर्वीच बाहेर काढले. तरुणांच्या मोबाईलवर, फेसबुकच्या पोस्टवर, स्टेटसवर त्याची छबी झळकू लागली. कृष्णा नदीपात्रात नाव चालविणारा हा नावाडी कृष्णाकाठचा आयडॉल बनला.

काडीकाडी गोळा करून उभारलेला स्वत:चा संसार, घर पाण्यात बुडाल्याची जखम बाजूला ठेवली. कुणाला फोन लावावा तर पाण्यात मोबाईल बुडाल्याने संपर्कच नाही. कोणी सांगायचे, हार्ट पेशंट आहे, बीपी, शुगर वाढली, पुराचं पाणी वाढलं, म्हातारी माणसं दम काढनाती... असे निरोप आले की नितीन सांगितलेल्या जागेवर हजर. माणसे सुरक्षित बाहेर पडली की, मिठ्ठी मारायची, हाता-पाया पडायच्या. आयाबाया ढसाढसा रडायच्या.

सुटलो एकदाचे या संकटातून म्हणून त्यांनी कृष्णामाईला हात जोडले की, त्यांच्या डोळ्यातून आसवे गळायची.. आपण करत असलेल्या नावाड्याच्या सेवेचे सार्थक झाल्याचं समाधान लाभायचं.

आंबकरी दादा म्हणजे नीतीनचे चुलते बापू आप्पा गुरव यांनी ७० वर्षे भुवनेश्वरवाडी ते औदुंबर अशी काठीच्या नावेतून भाविकांना आल्याड-पल्याड करण्याची सेवा केली. त्यांच्या पश्चात नितीनने १९९१ मध्ये नावेचा सुकाणू हाती धरला. सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत फेऱ्या सुरू. २००८ पासून वल्हे गेले नी यांत्रिक बोटीचा हँडल हाती आला. २००५ च्या महापुरात वल्ह्याच्या नावाने दोन हजार माणसे बाहेर काढली.

२००६ च्या महापुरात तर एनडीआरएफच्या बोटी नव्हत्याच. या एकट्याने चार हजार माणसे बाहेर काढलेली. २०१९ चा महापूर मोठ्या प्रवाहाचा. यंदा साडेतीन हजार माणसे एकट्याने बाहेर काढली. हे काम करताना कधी स्वत: एखादी सेल्फी किंवा फोटो काढला नाही.

पाण्याच्या प्रवाहाची दिशा, धार कशी पडते, भोवरा कुठे आहे, बोटीच्या पंख्यात पाला कुठे अडकेल, हे त्याला पक्के माहीत आहे. बोटीत प्रमाणापेक्षा जादा भरती केली की, धोका झालाच म्हणून समजा. नितीन नेहमी या गोष्टीची दक्षता घेतो. बोटीत माणसे किती भरली यापेक्षा ती सुरक्षित बाहेर कशी काढता येतील याला नावाड्याने महत्त्व द्यावे,असे तो म्हणतो.

यंदा महापुरात प्रशासनाने चौथ्या दिवशी बोटीची सोय केली. प्रत्येक गावाला यांत्रिक बोटी द्याव्यात, तरुण पिढीला आपण बोट चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासही पुढाकार घेणार असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या या शौर्याची दखल घेत भिलवडी ग्रामपंचायत, सर्व संस्था, भिलवडी पोलिसांनी यावर्षी भारतीय स्वातंत्र्यदिनी गावातील ध्वजारोहण करण्याचा सन्मान नितीन गुरवला दिला.
 

Web Title:  Krishnakath's Idol becomes Nitin, saving thousands of lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.