सांगली : कृष्णा नदीतील मासे मृत प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी विधीमंडळात लक्षवेधी मांडली. वसंतदादा साखर कारखान्याची डिस्टलरी स्वप्नपुर्ती शुगरकडून अनाधिकृतपणे चालविली जात होती. त्यांच्यावर काय कारवाई करणार? डिस्टलरीच्या माध्यमातून कुणाला फायदा होत होता, अशा प्रश्नांचा भडीमार करीत वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. याप्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौकशीचे आश्वासन दिले.दोन आठवड्यापूर्वी कृष्णा नदीतील लाखो मासे मृत झाले. याप्रकरणी प्रदुषण नियंत्रण मंडळाने पाहणी करून वसंतदादा साखर कारखाना चालविणाऱ्या दत्त इंडिया कंपनी व स्वप्नपूर्ती डिस्टलरीला नोटीस बजाविली होती. स्वप्नपूर्ती शुगर ही विशाल पाटील यांच्याशी संबंधित कंपनी आहे. या डिस्टलरीची पाईप फुटून मळीमिश्रीम पाणी नदीपात्रात मिसळल्याने मासे मृत झाल्याचा अहवालही प्रदुषण मंडळाने दिला होता. त्यानंतर साखर कारखाना व डिस्टलरी बंद करण्यात आली तसेच त्यांच्या वीज व पाणीपुरवठाही खंडीत करण्यात आला आहे.या प्रश्नी जयंत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. जयंत पाटील म्हणाले की, वसंतदादा कारखाना दत्त इंडिया कंपनीला चालविण्यास दिला आहे. पण कारखान्याची डिस्टलरी स्वप्नपूर्ती शुगरकडे असल्याचे दिसून येते. वास्तविक जिल्हा मध्यवर्ती बँकेने स्वप्नपूर्ती शुगरशी डिस्टलरीबाबत कसलाही करार केलेला नाही. त्यामुळे स्वप्नपुर्तीकडून डिस्टलरी अनाधिकृतपणे चालविली जात होती. त्यांच्यावर काय कारवाई करणार? ही डिस्टरली किती वर्षे सुरू आहे? त्याचा फायदा कोण घेत आहे? याचीही चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर वनमंत्र्यांनी चौकशीचे आश्वासन दिले. महापालिका एसटीपीसाठी ६२ कोटीमहापालिकेच्या शेरीनाल्याचे दुषित पाणी कृष्णा नदीत मिसळते. शेरीनाल्यावर शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी ६२ कोटीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. कृष्णा नदीत मासे मृत झाल्यानंतर शासनालाही जाग आली. विधानसभेत लक्षवेधीवर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटीपीसाठी ६२ कोटी देणार असल्याचे जाहीर केले.
कृष्णा नदी प्रदुषणप्रश्नी स्वप्नपूर्ती शुगरवर कारवाईची विधीमंडळात मागणी, जयंत पाटील यांची लक्षवेधी
By शीतल पाटील | Updated: March 20, 2023 18:38 IST