कृष्णेवर होतेय पुलांची माळ, नियोजनशून्य कारभाराचा गाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:24 IST2021-01-18T04:24:34+5:302021-01-18T04:24:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरालगतच्या कृष्णा नदीवर आधीच दोन पूल आहेत. त्यातील आयर्विनच्या पर्यायी पुलाचे काम मंजूर आहे. ...

कृष्णेवर होतेय पुलांची माळ, नियोजनशून्य कारभाराचा गाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरालगतच्या कृष्णा नदीवर आधीच दोन पूल आहेत. त्यातील आयर्विनच्या पर्यायी पुलाचे काम मंजूर आहे. आता शहराबाहेरून बायपास रस्ता व नवीन पुलाचा प्रस्ताव समोर आला आहे. हरिपूरजवळ आणखी एका पुलाचे काम पूर्ण होत आले. सांगली ते हरिपूर या तीन ते चार किलोमीटर अंतरातच नदीवर चार पूल होणार आहेत. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या नियोजनशून्य कारभारातून नदीवर पुलांची माळच उभारली जात आहे.
पूर्वी सांगली शहरात प्रवेश करणाऱ्यासाठी कृष्णा नदीवर १९२९ साली पूल बांधण्यात आला. त्याला ९० वर्षे पूर्ण झाली. शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी शहराबाहेरून बायपास रस्ता तयार करण्यात आला. सांगलीवाडी जकात नाक्यापासून माधवनगर रस्त्यापर्यंत हा नवीन बायपास झाला. तेथेही नव्याने पूल उभारला गेला. हा बायपास रस्ताही शेवटी शहरात येऊनच थांबला. तो पुढे मिरजेपर्यंत गेलाच नाही. त्यात आयर्विन पुलाची वयोमर्यादा संपल्याने त्याला पर्यायी पुलाची चर्चा सुरू झाली. त्यात सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेनंतर आयर्विन पुलाच्या पर्यायी पुलाला शासनानेही मंजुरी देत अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांची तरतूद केली. या नव्या पुलाची निविदा काढून वर्कऑडरही देण्यात आली, पण राजकीय वाद आणि नागरिकांच्या विरोधामुळे पुलाचे काम सुरू होऊ शकले नाही.
त्याचवेळी हरिपूर गावाजवळ कृष्णा नदीवर नव्याने पूल उभारण्याचे काम सुरू झाले. आता ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलालाही विरोध झाला, पण विरोधाला न जुमानता पुलाचे काम सुरूच ठेवण्यात आले. आता पुन्हा सांगलीवाडी ते हरिपूर लिंगायत स्मशानभूमी ते कोल्हापूर रोड या १०० फुटी डीपी रस्त्याच्या भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले आहे. भविष्यात रस्त्याचे काम सुरू झाल्यास पुन्हा कृष्णा नदीवर आणखी एक पूल उभा करावा लागणार आहे. सांगली ते हरिपूर चार ते पाच किलोमीटरच्या अंतरात सध्या तीन पूल अस्तित्वात आहेत. त्यात आणखी एका पुलाची भर पडेल. वास्तविक इतक्या पुलांची गरज सांगलीला आहे का? याचा विचार करण्याची आवश्यकता होती. यातून प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या नियोजनशून्यतेचे दर्शन होते.
चौकट
महापुराची धास्ती
कृष्णा नदीला गेल्या पंधरा वर्षांत तीनदा महापुराशी सामना करावा लागला. त्यात २०१९ मध्ये झालेला महापूर तर प्रलयंकारीच होता. निम्म्याहून अधिक सांगली पाण्याखाली होती. विविध मार्गांनी नदीच्या प्रवाहात अडथळे आणल्याने पाण्याचा फुगवटा होऊन पुराचे पाणी शहरात शिरल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. त्यात नदीवरील पुलांची समावेश होतो. हरिपूरला २००५ च्या पुरात पाणी शिरले नव्हते, पण २०१९ ला मात्र पाणी गल्लीबोळात शिरल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भविष्यात महापुराची स्थिती निर्माण झाल्यास चार पुलांमुळे आणखी शहर पाण्याखाली जाण्याची धास्ती आहे.