सांगली : येथील तरुण भारत व्यायाम मंडळाच्या क्रीडांगणावर तब्बल ३० वर्षांनंतर आयोजित ‘महाराष्ट्र श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेत अंतिम फेरीत थरार पाहायला मिळाला. कोल्हापूरच्या अजिंक्य रेडेकर आणि ठाण्याच्या राहुल क्षेत्रे यांच्यात चुरस रंगली होती; मात्र प्रेक्षकातून अगोदर जोरदार प्रतिसाद मिळालेल्या अजिंक्य रेडेकर याने पिळदार शरीरयष्टीच्या जोरावर बाजी मारली. अजिंक्यला ‘महाराष्ट्र श्री’ विजेता जाहीर करताच शौकिनांनी टाळ्या, शिट्ट्या वाजवत जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनकडून यंदाची महाराष्ट्र श्री ही राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्याचा बहुमान तरुण भारत व्यायाम मंडळाला मिळाला होता. यंदाच्या महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी पाचशेहून अधिक शरीरसौष्ठवपटू राज्यभरातून दाखल झाले होते. दहा गटात स्पर्धा घेण्यात आली.शरीरसौष्ठवपटूंनी पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करत शौकिनांची दाद मिळवली. स्पर्धेत दहा गटात प्रमोद सूर्यवंशी, सांगली (५५ किलो), नितीन म्हात्रे, ठाणे (५५ ते ६० किलो), राकेश मोरे, पालघर (६० ते ६५ किलो), बप्पन दास, मुंबई (६५ ते ७० किलो), पंचाक्षरी लोणार, सोलापूर (७० ते ७५ किलो), नंदलाल झा, मुंबई (७५ ते ८० किलो), अजिंक्य रेडेकर, कोल्हापूर (८० ते ८५), राहुल क्षेत्रे, ठाणे (८५ ते ९०), गजानन कावंडे, कोल्हापूर (९० ते १०० किलो), रशिद शेख, ठाणे (शंभर किलोवरील गट) यांनी विजेतेपद मिळवले.दहा गटातील विजेत्यांमध्ये महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी लढत झाली. त्यामध्ये महाराष्ट्र श्री किताबासाठी अजिंक्य रेडेकर, राहुल क्षेत्रे, पंचाक्षरी लोणार यांच्यात चुरस झाली; परंतु अजिंक्य रेडेकर याने पिळदार शरीरयष्टीच्या जोरावर विजेतेपद पटकावले. राहुल क्षेत्रे उपविजेता ठरला. तर पंचाक्षरी लोणार याने तृतीय क्रमांक मिळवला.माजी मंत्री, आमदार विश्वजीत कदम यांच्या हस्ते अजिंक्य रेडेकर याला दीड लाखाचे पारितोषिक व महाराष्ट्र श्री किताब देऊन गौरवले. राहुल क्षेत्रेला ७५ हजारांचे पारितोषिक तर पंचाक्षरी लोणार याला ३५ हजारांचे पारितोषिक दिले. बेस्ट पोझरचा बहुमान नितीन म्हात्रे याने मिळवला.
कोल्हापूरचा अजिंक्य रेडेकर ‘महाराष्ट्र श्री’; सांगलीत पार पडल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 11:26 IST