खिलारवाडीच्या तरुणाचा मामाकडून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:18 IST2021-07-01T04:18:58+5:302021-07-01T04:18:58+5:30
जत : मुलीस पळवून नेल्याच्या रागातून जत तालुक्यातील खिलारवाडी येथील तरुणाचा मामानेच आठवड्यापूर्वी पळवून नेऊन खून केल्याचे बुधवारी उघडकीस ...

खिलारवाडीच्या तरुणाचा मामाकडून खून
जत : मुलीस पळवून नेल्याच्या रागातून जत तालुक्यातील खिलारवाडी येथील तरुणाचा मामानेच आठवड्यापूर्वी पळवून नेऊन खून केल्याचे बुधवारी उघडकीस आले. नाना शिवाजी लोखंडे (वय २७) असे मृताचे नाव असून, याप्रकरणी तिघांना अटक केली असून, एक जण फरारी आहे.
अर्जुन महादेव शिंदे (४०, रा. अभिनंदन कॉलनी, सांगली), जगन्नाथ बाळाप्पा लोखंडे (२३, रा. खिलारवाडी), विनायक बाळासाहेब शिंगाडे (२१, रा. सुभाषनगर, मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर रावसाहेब लक्ष्मण लोखंडे (रा. सुभाषनगर, मिरज) फरारी आहे.
याबाबत उपविभागीय पोलीस अधीक्षक रत्नाकर नवले व पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी पत्रकार बैठकीत माहिती दिली. ते म्हणाले की, दि. २२ जूनरोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास बिळूर ते वज्रवाड रस्त्यावरील खिलारवाडी येथील पानपट्टीसमोरून नाना लोखंडे यास अज्ञातांनी मोटारीतून पळवून नेले होते. त्याबाबतची फिर्याद नानाचा भाऊ धानू लोखंडे याने जत पोलिसांत दिली होती. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याने नवले यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे, तपासासाठी वेगवेगळी पथके तयार करून रवाना केली होती. पोलिसांनी संशयावरून अर्जुन शिंदे, जगन्नाथ लोखंडे, विनायक शिंगाडे यांना ताब्यात घेऊन चाैकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
नाना लोखंडे याने मामा अर्जुन शिंदे याच्या मुलीस पळवून नेले होते. त्याचा राग मनात धरून अर्जुनने नानाचा खून करण्याचा कट रचला. त्याने तिघांच्या मदतीने खिलारवाडीतून नाना लोखंडे यास पळवून नेले. तोरवी (ता. विजापूर) येथील तिकोटा ते विजापूर रस्त्यालगत नेटीकट्टी ओढ्याच्या पुलाजवळ त्याला नेले आणि डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला. यातील तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक ए. एस. कोळी, सहायक पोलीस निरीक्षक महेश मोहिते, संजय क्षीरसागर, युवराज घोडके, सचिन हाके, उमर फकीर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.