कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यातील दुष्काळ व टंचाई स्थितीची केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:14 PM2019-05-11T12:14:56+5:302019-05-11T12:16:44+5:30

दुष्काळी भागातील पशुधन वाचवणे गरजेचे आहे. जनावरांना पुरेसा चारा, पाणी आणि पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.

Kawethamahalak, Atpadi Taluka drought and scarcity situation in the survey | कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यातील दुष्काळ व टंचाई स्थितीची केली पाहणी

कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यातील दुष्काळ व टंचाई स्थितीची केली पाहणी

Next
ठळक मुद्देपुरेसा चारा, पाणी आणि पशुवैद्यकीय सुविधा द्या-डॉ. दीपक म्हैसेकरदुष्काळी भागातील पशुधन वाचवा

सांगली : सन 2018-19 मध्ये सांगली जिल्ह्यातील 5 तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या दुष्काळी संकटावर मात करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना गांभीर्याने करा. दुष्काळी भागात आवश्यकतेनुसार पाणी टँकर आणि मागणीनुसार चारा छावण्या सुरु कराव्यात. दुष्काळी भागातील पशुधन वाचवणे गरजेचे आहे. जनावरांना पुरेसा चारा, पाणी आणि पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.

दुष्काळी व टंचाई परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डॉ. दीपक म्हैसेकर यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील लांडगेवाडी, चुडेखिंडी येथे आणि आटपाडी तालुक्यात तडवळे येथे भेट देऊन प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी केली व आवश्यक उपाययोजनांबाबत आढावा घेतला.

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव, उपायुक्त विलास जाधव, उपायुक्त (पुनर्वसन) दीपक नलवडे, उपायुक्त (पुरवठा) नीलिमा धायगुडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी, भारतीय जैन संघटनेचे सुरेश पाटील आदि उपस्थित होते.

प्रारंभी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी लांडगेवाडी येथे ज्या ठिकाणी टँकरमध्ये पाणी भरले जाते, (टँकर फिडिंग) त्या ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी टँकर, पाण्याचे स्त्रोत याची माहिती घेवून ज्या ठिकाणी टँकरमध्ये पाणी भरले जाते त्या ठिकाणी ओटी टेस्टच्या प्रात्यक्षिकाची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी ब्लीचिंग पावडरचा साठा करावा व लोकांना पिण्यायोग्य पाणी मिळेल याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या.

नवीन सूचनेनुसार चारा छावणीतील जनावरांना 15 किलोऐवजी 18 किलो चारा द्यावा, पिण्यास पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे. जनावरांची रजिस्टरमध्ये नोंद घेऊन टॅगिंग करावे, छावणीत दाखल होणाऱ्या जनावरांचे पशुपालकांना कार्ड वितरित करावे. संस्थांनी शासन निर्णयातील तरतुदींप्रमाणे छावण्यांचे अभिलेख काटेकोरपणे व्यवस्थित ठेवावेत, असे डॉ. दीपक म्हैसेकर यांनी यावेळी सांगितले.

कवठेमहांकाळ तालुक्यातील चुडेखिंडी येथे सुरु करण्यात आलेल्या चारा छावणीस भेट देऊन छावणी चालक बापू पाटील व शेतकऱ्यांशी संवाद साधला. चुडेखिंडी येथील छावणी 7 मे रोजी सुरु करण्यात आली असून, या छावणीत 621 जनावरे असून, ही संख्या वाढत आहे.

तसेच, श्री गजानन कामगार मजूर सहकारी सोसायटी, आटपाडीच्या वतीने तडवळे येथे सुरु करण्यात आलेल्या चारा छावणीस त्यांनी भेट दिली. या छावणीत 137 लहान व 624 मोठी अशी एकूण 761 जनावरे दाखल आहेत.

यावेळी आटपाडी तालुक्यात 12 गावे व 214 वाड्या वस्त्यांवर एकूण 34 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यातून 44 हजार 224 लोकसंख्येला पाणी पुरवण्यात येत असून, 17 विहिरी, कूपनलिका अधिग्रहित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात आणि अश्विनी जिरंगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) नीलेश घुले, कवठेमहांकाळच्या तहसिलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी रवींद्र कणसे, आटपाडीचे तहसीलदार सचिन लुंगटे, प्रभारी गटविकास अधिकारी अरुण जाधव, पशुधन विकास अधिकारी, करगणी डॉ. अविनाश चव्हाण आदि उपस्थित होते.

Web Title: Kawethamahalak, Atpadi Taluka drought and scarcity situation in the survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.