कवठेमहांकाळमधून अपक्ष लढणार : खराडे
By Admin | Updated: September 13, 2014 00:14 IST2014-09-13T00:12:57+5:302014-09-13T00:14:28+5:30
घोरपडेंना विरोध : राजीनामा देणार

कवठेमहांकाळमधून अपक्ष लढणार : खराडे
सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून भाजपने माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना उमेदवारी दिल्यास, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची घोषणा ‘स्वाभिमानी’चे प्रवक्ते महेश खराडे यांनी आज (शुक्रवारी) सांगलीत पत्रकार परिषदेत केली. शिवाय पलूस-कडेगाव, शिराळा, जत या मतदारसंघात अपक्ष उमेदवार उभे करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
ते म्हणाले की, घोरपडे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी तडजोड करून अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर पाच वर्षात घोरपडे एकदाही फिरकले नाहीत. शेतकरी, दुष्काळग्रस्तांच्या समस्यांशी त्यांना काहीही देणे-घेणे नाही. सामान्य जनता अडचणीत असताना घोरपडे अज्ञातवासात होते. मतदारांना, आपण तुमच्या दारात मते मागण्यासाठी यापुढे येणार नसल्याचे सांगत होते. परंतु, सध्या मोदी लाटेवर स्वार होऊन आमदार होण्याची स्वप्ने त्यांना पडू लागल्यावर मतदारांची त्यांना आठवण झाली आहे. घोरपडे यांच्या संधिसाधू, स्वार्थी वृत्तीला आमचा विरोध आहे.
भाजपने घोरपडे यांना उमेदवारी दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांचा प्रचार करणार नाही. प्रसंगी प्रवक्तेपदाचा राजीनामा देऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहे. (प्रतिनिधी)