कवलापूरकरांच्या नशिबी पळापळच

By Admin | Updated: November 18, 2014 23:26 IST2014-11-18T22:10:54+5:302014-11-18T23:26:51+5:30

कूपनलिकांचा आधार : साथीच्या आजारांची ग्रामस्थांना भीती

Kavalapurkar's death was delayed | कवलापूरकरांच्या नशिबी पळापळच

कवलापूरकरांच्या नशिबी पळापळच

सांगली : माधवनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना आर्थिक संकटात सापडल्याने, कवलापूर (ता. मिरज) या गावातील ग्रामस्थांच्या नशिबी पाण्यासाठीची पळापळ ही पूजलेलीच आहे. गेल्या दहा दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरु आहे. सध्या कूपनलिकांचा आधार असला तरी, हे पाणी पिण्यास योग्य नसल्याने यातून साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
सांगलीच्या कृष्णा नदीपासून दहा किलोमीटरवर असलेले कवलापूर गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी तहानलेले आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे दहा लाखांचे बक्षीस गावाने पटकाविले आहे. मात्र पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणच पुढाकार घेत नाही. ग्रामपंचायतीची पाणीपट्टी वसूल करणारी यंत्रणा सक्षम नाही. ग्रामस्थ कामानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात आल्यानंतरच पाणीपट्टी वसुली केली जाते. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने वसुलीसाठी दररोज घरोघरी जाणे होत नाही.
सध्या गावातून पाणीपट्टीची रक्कम किती वसूल होते, त्यावरच पाणी दिले जाते. महिन्यातून केवळ सहावेळा पाणी सोडले जाते. यामध्येही कुठे गळती निर्माण झाली, तर चारच वेळा पाणी येते. पाणीपट्टी वसुलीत शिस्तबद्धपणा आला, शंभर टक्के वसुली झाली, तरच दररोज पाणी सोडण्यासाठी ग्रामपंचायतीची तयारी आहे. यासाठी ग्रामपंचायत सदस्य, गावातील स्थानिक पुढाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. परंतु पाण्याच्या प्रश्नावर कोणीही एकत्र येताना दिसत नाही.
पाणी वेळेवर सोडण्यात येत नसल्याने ग्रामस्थही पाणीपट्टी भरण्यास पुढे येत नाहीत. वर्षानुवर्षे पाण्याचा हा प्रश्न प्रलंबितच आहे. गावात कूपनलिका आहेत, मात्र ते पाणी पिण्यास योग्य नसले तरी ग्रामस्थांना पर्याय नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Kavalapurkar's death was delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.