कर्मयोगिनी माई : कुसुमताई नायकवडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST2021-07-17T04:21:12+5:302021-07-17T04:21:12+5:30
क्रांतिवीर नागनाथ अण्णांच्या पत्नी कुसुमताई नायकवडी म्हणजे अण्णांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यात साथ देणाऱ्या, वसतिगृहात आलेल्या मुलां-मुलींच्या, धरणग्रस्तांच्या, प्रकल्पग्रस्तांच्या, ...

कर्मयोगिनी माई : कुसुमताई नायकवडी
क्रांतिवीर नागनाथ अण्णांच्या पत्नी कुसुमताई नायकवडी म्हणजे अण्णांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यात साथ देणाऱ्या, वसतिगृहात आलेल्या मुलां-मुलींच्या, धरणग्रस्तांच्या, प्रकल्पग्रस्तांच्या, दुष्काळग्रस्तांच्या सर्वसामान्यांच्या माई होत्या.
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिकदृष्ट्या त्यांनी आपल्या सभोवतालच्या लोकांना मदत करून त्यांचा सामाजिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला. अंधश्रद्धेला त्यांनी कायम विरोध केला. मुलांच्या शिक्षणाला त्यांनी सर्वाधिक महत्त्व दिले. अन्याय, अत्याचार यातून स्त्रियांना मुक्त करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. स्त्रियांनी स्वत:च्या पायावर उभा राहून स्वावलंबी झाले पाहिजे हा विचार घेऊन त्यांनी शिक्षणाचे कार्य केले. अविरत धडपड केली. त्यांच्या कार्याची
दखल घेऊन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने महाराष्ट्र सरकारने त्यांना सन्मानित केले.
पुरोगामी महाराष्ट्राच्या उभारणीसाठी ज्यांनी आपल्या आचरणाने, विचाराने आणि कृतीतून प्रेरणा दिली त्यात क्रांतिवीर नागनाथ अण्णांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. त्या अण्णांच्या विचाराला माईंनी मोठी साथ दिली. त्या कायम सावलीसारख्या अण्णांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. संयुक्त महाराष्ट्राचा लढा, महागाई, रस्ते यासाठी लढा, साराबंदी चळवळ, शेतकरी संघटना, धरणग्रस्तांचा न्याय मागणीचा लढा, दुष्काळी भागासाठी पाण्याचा लढा, स्त्री मुक्ती चळवळ, दलित आदिवासी व ग्रामीण साहित्य संमेलने या सर्ब चळवळीमध्ये त्या अण्णांच्या बरोबर रणरागिणी म्हणून लढल्या.
हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाची निर्मिती मुळात संघर्षात झाली. त्या संघर्षांतही त्या रणरागिणी होत्या. सावली माणसाबरोबर फिरते त्याप्रमाणे पतीच्या सर्व संघर्षामध्ये व चळवळीमध्ये, सर्व कार्यात एकरूप झाल्या. शेवटपर्यंत त्यांचे हुतात्मा समूहावर बारकाईने लक्ष होते, मार्गदर्शन होते. अण्णांच्या निधनानंतर अण्णांची अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा, त्यांच्या विचाराचा वारसा पुढे चालविण्याचा त्यांनी ध्यास घेऊन प्रयत्न केला.
अंधश्रद्धेविरुद्ध लढणे हा त्यांचा जीवनधर्म होता. स्त्रियांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाले पाहिजे. त्यासाठी त्यांनी शिकले पाहिजे, असा विचार माई सातत्याने मांडत. वाचनाची आवड, अभ्यासू, संयमी, काटकसरीची वृत्ती, नीटनेटकेपणा आणि स्वच्छता, उत्तम आरोग्य, श्रमाचे महत्त्व, स्वावलंबी वृत्ती, विचारांची व्यापकता, कोणत्याही आव्हानाला तोंड देण्याचा निरडपणा व पडेल ते काम करण्याची तयारी असे अनेक गुण माईंकडे होते. कर्तव्यसंपन्नतेच्या उत्तुंग आदर्श आपल्या वर्तणुकीतून बिंबवणारे व्यक्तिमत्त्व, खंबीर, अभ्यासू, कर्तबगार असे हे ‘मुक्त विद्यापीठ’ आचारसंपन्न होते.
कर्तव्यसंपन्नतेचा आदर्श आपल्या कृतीतून मांडणाऱ्या, सामाजिक प्रश्नांची अचूक जाण असणाऱ्या शिक्षणाबद्दल व स्त्रियांच्या उन्नतीसाठी अविरत परिश्रम करणाऱ्या पुरोगामी विचारांचा अंगीकार करणाऱ्या, सर्वसामान्यांच्या विकासामध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्त्व असणाऱ्या ‘कर्मयोगिनी’ माई होत्या.