सांगलीच्या दिव्यांग काजल कांबळेने अनुभवला वानरलिंगी सुळक्यावर रॅपलिंगचा थरार
By संतोष भिसे | Updated: May 25, 2023 18:35 IST2023-05-25T18:34:55+5:302023-05-25T18:35:23+5:30
किल्ले जीवधन ते वानरलिंगी सुळका या दरम्यानची २०० फुट दरी काजलने क्रॉस केली

सांगलीच्या दिव्यांग काजल कांबळेने अनुभवला वानरलिंगी सुळक्यावर रॅपलिंगचा थरार
सांगली : किल्ले जीवधन ते वानरलिंगी सुळका या दरम्यानची २०० फुट दरी क्रॉसिंग करण्याचा थरार सांगलीच्या काजल कांबळेने अनुभवला. सुळक्याच्या शिखरावरून ३०० फुट रॅपलिंगचे धाडसही तिने केले.
काजलच्या मोहिमेची सुरुवात नाणेघाट वस्ती (ता. जुन्नर, जि. पुणे) येथून झाली. दोन तासांच्या पायपीटीनंतर जीवधन गडावरील दरी क्रॉसिंग करण्याच्या ठिकाणी पोहोचली. सुरक्षेची पुरेपूर काळजी घेत गडावरून क्रॉसिंग सुरु केले. ३० सेकंदांत दरी ओलांडली. दरी ओलांडल्यावर वानरलिंगी सुळक्याच्या शिखरावर पोहोचता येते. येथे थोडा वेळ थांबून पुन्हा ३०० फुट रॅपलिंग करत सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचली.
मोहिमेत डॉ. समीर भिसे, विशाल गोपाळे, अमोल हिंडे, अनिकेत आवटे, विजय पाटील, सचिन मराठे, ऋतुराज मराठे, मंदार मोहिते, कार्तिक, प्रदीप इंगळे, अक्षय साळुंके, सतीश तुपे, सुबोध गुजराथी आदी गिर्यारोहक सहभागी झाले होते. चेतन शिंदे, जाॅकी साळुंखे, राजश्री चौधरी, यश पवार, लव थोरे यांनी मार्गदर्शन केले. अनंता मरगळे, सूरज नेवासे यांनी तांत्रिक सहकार्य केले.
चुकीला माफी नाही
२०० फूट दरी ओलांडणे आणि ३०० फुट रॅपलिंगचा थरार काळजाचा थरकाप उडवणारा असतो असे काजलने सांगितले. थोड्याशाही चुकीला निसर्ग माफी देत नाही. वेगवान वारे, डोळ्यांना असह्य उन्हाची तिरीप, उष्णतेच्या लाटा अशा अनेक नैसर्गिक आव्हानांचा सामना करत तिने मोहीम पूर्ण केली.